वैद्यकीय उप अधीक्षकपदी डॉ. किशोर सुरवसे यांची नियुक्ती
पोलीस डायरी प्रतिनिधी, परभणी,: जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा अस्थिव्यंग रुग्णालयातील अपघात कक्ष, औषधी भांडार, सुरक्षा व्यवस्था, शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण विभाग, विविध आंतररुग्ण विभाग व इतर विभाग सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून व योग्य समन्वय साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची वैद्यकीय उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी प्रसद्धिीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परभणी या संस्थेच्या अधिनस्त जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा अस्थिव्यंग रुग्णालय येथे पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली असून, आहे. डॉ. किशोर सुरवसे यांनी मूळ पदाचा कार्यभार सांभाळून वैद्यकीय उप अधीक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार शासनाकडून या संस्थेमध्ये नियमित वैद्यकीय उप अधीक्षक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत सांभाळावा. जिल्हा रुग्णालय, परभणी, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा अस्थिव्यंग रुग्णालय येथील अपघात कक्ष, औषधी भांडार, सुरक्षा व्यवस्था, शस्त्रक्रिया गृह, बाह्यरुग्ण विभाग, विविध आंतररुग्ण विभाग व इतर विभागात रुग्णहिताच्या दृष्टीने सर्व यंत्रणेत समन्वय ठेवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
परभणी येथे 100 एमबीबीएस विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या आदेशान्वये वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई आणि आरोग्य संचालनालयाचे संचालक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार नव्याने निर्माण झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी या संस्थेशी संलग्नित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.