पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर :
येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी, शिक्षा बंदी आणि न्यायालयीन बंद्यांना आपल्या कुटुंबियांशी संवाद साधता यावा यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा प्रारंभ कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१६) करण्यात आला.
कारागृहातील बंद्यांचा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, वकील यांच्याशी संपर्क रहावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे बंद्यांना आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिटे दुरध्वनीद्वारे संवाद साधता येणार आहे. मंगळवारी या सुविधेची सुरुवात करण्यात आली. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार, अधीक्षक एन.जी. सावंत तसेच बंदीजनांची उपस्थिती होती.
बंद्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता यावा यासाठी ही सुविधा असून अनेक बंद्यांचे नातेवाईक दूर असल्याने व आर्थिक परिस्थितीमुळे भेटण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे कुटुंबियांची हालहवाल जाणून घेणे त्यातून त्यांना सतावणाऱ्या चिंता व त्यातून येणाऱ्या ताणतणावातून मुक्तता व्हावी हा या सुविधा देण्यामागील उद्देश आहे. शिवाय न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना वकिलांशीही संवाद साधता येणार आहे. सद्यस्थितीत कारागृहातील ६५० बंद्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे तसेच कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.