राज्य उत्पादन शुल्क तर्फे अवैध दारूविरूद्ध चार कारवाई
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतूक विरूद्ध कारवाई सुरू केली आहे. यात आज दि. 23 एप्रिल रोजी चार कारवाया करण्यात आल्या. यात 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक मलकापूर यांनी दि. २३ एप्रिल रोजी बोदवड-मलकापूर रस्त्यावर बोदवड, जि. जळगाव येथील एका गुन्ह्यांमध्ये एक स्विप्ट चारचाकी वाहनामध्ये एकुण देशी २५.१२ लिटर आणि विदेशी १७.३२ लिटर असा २ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर श्री. शिंदे आणि जवान ए. पी. सुसरे यांनी सहभाग घेतला.
तसेच चिखलीच्या पथकाने नशिराबाद फाट्याजवळ नाईकनगर, ता. सिंदखेडराजा येथे १ पिकअप बोलेरो चारचाकी वाहनासह देशी दारु १९०.०८ लिटर व विदेशी दारू ८.६४ लिटर मद्य पकडुन ७ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निरीक्षक श्री. रोकडे, दुय्यम निरीक्षक नयना देशमुख, श्री. पहाडे, जवान श्री. तिवाने, संजीव जाधव यांनी सहभाग घेतला.
बुलडाणाच्या पथकाने देऊळघाट येथे दोन कारवाया केल्या. यात पहिल्या कारवाईत अशोक सुखदेव पन्होळे याच्या राहत्या घरी देशी दारु २६४.९6 लिटर मद्य पकडून १ लाख ३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निरीक्षक के. आर. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख, जवान अवचार, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या कारवाईत गजानन दगडू पन्होळे याच्या राहत्या घरातून देशी दारू ४३.२० लिटर मद्य पकडून १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत २०४ गुन्हे नोंदविले असून २०० वारस गुन्ह्यात २०८ आरोपींना अटक केली आहे. यात २२ वाहनांसह ३५ लाख ८३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व गुन्ह्यांमध्ये देशी मद्य १ हजार ३४०.४ लिटर. विदेशी मद्य १५०.५२ लिटर. बिअर ९१.०७ लिटर, ताडी १४८ लिटर, रसायन सडवा २६ हजार ९१४ लिटर, हातभट्टी १ हजार ६७६ लिटर पकडण्यात आले आहे.