हमीदराने मका खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन: 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी लागणार
पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, :रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरडधान्य मका हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.
जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी नोंदणी सुरु करणेसाठी १६ खरेदी केंद्राना मान्यता दिलेली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, बुलढाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी बु. केंद्र – साखरखेर्डा, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, देऊळगावराजा केंद्र सिंदखेडराजा, नांदुरा अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, नांदुरा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, चिखली, ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, देऊळगावराजा, कृषी उत्पन्न बाजार समिती, संग्रामपूर केंद्र वरवंड बकाल, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी बिबी केंद्र बिबी या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये सदर ठिकाणी मका खरेदीसाठी नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करणेसाठी, आधारकार्ड, खरीप २०२३-२४ चा सातबाऱ्याचा ऑनलाईन पिकपेरा, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल नंबर घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. तसेच हाताने लिहिलेले सातबारा आणि खाडाखोड केलेले कागदपत्र कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाहीत. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावयाचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन सातबारावरील मका पिकपेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही. तसे झाल्यास यास खरेदी केंद्र जबाबदार राहणार आहे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.