आर्थिक राष्ट्रवादाचा अवलंब करण्यासह
नैसर्गिक संसाधनांचा किमान व काटेकोर वापर व्हावा
नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ उत्साहात
पो.डा.वार्ताहर , नागपूर : नव्या शैक्षणिक धोरणात देशाच्या सांस्कृतिक वैशिष्टयांचे परिपूर्ण प्रतिबिंब असून गेम चेंजर ठरू शकणारे हे धोरण विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्षमतेवर आधारित तसेच वर्तमान गरजांशी सुसंगत आहे. त्याचा सर्व राज्यांनी अंगिकार करावा,असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. आर्थिक राष्ट्रवादाचा अवलंब करणे देशासाठी मोठया प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार असल्याचे स्पष्ट करतांनाच नैसर्गिक संसाधनाचा किमान व काटेकोर वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ आज कविवर्य सुरेश भट सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे मंचावर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, शिक्षण कोणत्याही देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावत असते हीच बाब महत्वाची मानत नवे शैक्षणिक धोरण तयार केले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेवून बदल करण्याची लवचिकता त्यात आहे. या धोरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासाचे सूत्र समाविष्ट करतांनाच देशाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्याची दूरदृष्टी आहे. देशातील बऱ्याच राज्यांनी या धोरणाचा स्वीकार केला आहे. देशातील उद्योजकांनीही आपल्या विद्यापीठांना मदतीचा हात दयावा असे आवाहनही त्यांनी केले.
देशाच्या गरजा भागविण्यासाठी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आर्थिक राष्ट्रवाद जपण्याचा आणि नैसर्गिक संसाधनांचा काटेकोरपणे वापर करण्याचे आवाहन करून उपराष्ट्रपतींनी म्हणाले, उद्योगासाठी देशांमध्ये स्थानिक पातळीवर कच्चामाल तयार झाला पाहिजे. त्यासाठी स्थानिक उद्योजकांनी पुढे यावे तसेच नागरिकांनीही स्थानिक मालाला प्रोत्साहन दयावे.
नागपूर विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेताना त्यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर विचार करून स्टार्टस अप ,युनिकॉन उभारावेत. अलिकडच्या काळात भारताने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहे. 2022मध्ये जागतिक स्तरावर झालेल्या डिजिटल आर्थिक व्यवहारात भारताचा हिस्सा हा तब्बल 46 टक्के इतका मोठा होता. याच वर्षी डेटा वापरात भारताचे प्रतिव्यक्ती सरासरी प्रमाण हे अमेरिका आणि चीनच्या एकत्रित वापरापेक्षाही जास्त होते. सप्टेबर 2022 मध्ये भारत हा जगातील पाचवी आर्थिक महासत्ता झाला असून या दशका अखेर देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल तर स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी म्हणजेच 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या स्थानावर असेल,असा विश्वासही उपराष्ट्रपतींनी व्यकत् केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देवून उपराष्ट्रपतींनी भाषणाचा समारोप केला.
विद्यापीठाची गौरवशाली पंरपरा जपा – राज्यपाल
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या विविध ज्ञानशाखांच्या माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या नागपूर विद्यापीठाने भविष्यातही ही उज्ज्वल परंपरा कायम राखावी, असे आवाहन करुन राज्यपाल बैस म्हणाले, पूर्वी रोजगाराच्या संधी मर्यादित होत्या. आता समाजात घडत असलेल्या परिवर्तनामुळे सरकारी क्षेत्रातील रोजगार कमी होऊन खाजगी क्षेत्रातील संधी वाढत आहेत. मात्र त्यासोबतच पदोपदी स्वत:ला सिध्द करण्याचे आवाहनही निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमिवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुरदर्शी नेतृत्वामुळे तयार झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे उद्यमशील समाजासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होणार आहे. जगातील सर्वाधिक तरुण देश असणाऱ्या भारताकडे जगाचे कार्यस्थळ होण्याची क्षमता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांनी निर्धाराने प्रयत्न करावेत. पूर्वी जगभरातून विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी भारताकडे धाव घेत असत. देशातील विद्यापीठांनी हा वारसा पुढे नेतांना अधिकाधिक शिक्षक तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचे महत्वाचे योगदान- नितीन गडकरी
विदर्भाच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये नागपूरसह या भागातील पाचही विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तंत्रज्ञान व संशोधन या क्षेत्रात नागपूर विद्यापीठाने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे औषधनिर्माण शास्त्रासह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला देश-विदेशात या विद्यापीठाला विशेष ओळख मिळाली आहे. विदर्भाचा सर्वांगिण विकास आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठाने सदैव पुढाकार घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
नागपुरातील मिहानसारखा प्रकल्प येथील युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा ठरत असल्याचे सांगताना श्री गडकरी म्हणाले की, या प्रकल्पामध्ये नागपूर विद्यापीठाच्या सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण होईल अशी क्षमता आहे. माहिती तंत्रज्ञान तसेच हवाई दळणवळण क्षेत्रातील अनेक प्रकल्प येथे येत आहेत. या उद्योगांना आवश्यक असलेले तज्ज्ञ व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होईल या दृष्टीने विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करावेत अशी सूचना यावेळी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या विचारांचा वारसा हे विद्यापीठ पुढे घेवून जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच श्री गडकरी म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाने सुद्धा विविध क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करून विदर्भाच्या विकासामध्ये सक्रिय भूमिका बजावावी.
विद्यापीठ सामाजिक चळवळीचे केंद्र- उपमुख्यमंत्री
नागपूर विद्यापीठाचा इतिहास गौरवास्पद असून हे विद्यापीठ केवळ शिक्षणाचे नव्हे तर सामाजिक चळवळीचे केंद्र असल्याचा गौरोद्गार काढून श्री फडणवीस म्हणाले, देश आणि समाजाची गरज भागवण्यासाठी या विद्यापीठाने आजपर्यंत समर्थपणे योगदान दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांना या विद्यापीठाने मदत केली होती. इंग्रज राजवटीत विद्यापीठाने महात्मा गांधींना मानद डॉक्टरेट प्रदान केली होती. तसेच त्यानंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही डिलीट प्रदान केली होती. राष्ट्रभक्तीचा मोठा संस्कार या विद्यापीठाला लाभला आहे . साहित्य, संस्कृती ,समाजकारण, राजकारण, प्रशासन, समाजसेवा आदी क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची मोठी फळी या विद्यापीठाने दिली आहे. भविष्यात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे आव्हान आपल्यासमोर असताना विद्यापीठाकडून आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्याची जबाबदारी आहे. महाविद्यालयांना जास्तीतजास्त स्वायत्तता कशी देता येईल, कामकाजात पारदर्शकता कशी आणता येईल, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम कसे सुरु करता येतील याबाबत आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन करून शताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठाला राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख मांडला. उपराष्ट्रपतींच्या हस्ते शताब्दी महोत्सव समारंभानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘शतदीप पूर्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी आभार मानले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते सुरेश भट सभागृहाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस दलाने उपराष्ट्रपतींना मानवंदना दिली.