मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आज आयोगाच्या कामकाजाचे सादरीकरण केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक – आर्थिक विकासासाठी आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण कृती कार्यक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने शेतकऱ्यांना फायदा होईल अशारितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत, अशा उपक्रमांसाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आपल्या जंगलांमध्ये आणि परिसरात वनौषधींची मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना देखील त्यांची माहिती आहे. या सर्व नैसर्गिक संपत्तीचे मूल्यवर्धन होऊन, त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचा नाशवंत माल दीर्घकाळ टिकावा यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध करावे लागेल. यामुळे आपल्याला समृद्धी महामार्गालगतची १८ नोड्स म्हणजे नवनगरे विकसित होतील. याठिकाणी विविध पायाभूत सुविधांच्या दृष्टीने विकास होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणे, लोणार सरोवर येथे केंद्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि एमटीडीसी यांच्या वतीने सुरू असलेला प्रकल्प गतीने पूर्ण करणे, ठाणे येथे विज्ञान केंद्र सुरू करणे असे महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
आयोगाच्या सदस्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण आणि उद्योग विभागाच्या सचिवांचा समावेश करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आयोगाच्या जैव वैद्यकीय उपकरण निर्मिती उपक्रम व विविध प्रकल्प, बायोमेडिक पार्क, महाराष्ट्र जनुक कोष, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एमएसएमई आंतरवासिता या उपक्रमांची विविध योजना आणि धोरणांशी सांगड घालण्याचेही निश्चित करण्यात आले. राज्यातील कोल्हापुरी गुळ, हळद आणि बांबू या महत्त्वाच्या उत्पादनांविषयी आयोग राबवित असलेल्या कार्यक्रमाची चर्चा झाली.