सावित्रीबाई फुलेंच्या १२७ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासंदर्भात
या लेखाला निमित्त होते पुणे विद्यापिठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव दिल्यानंतर त्या विद्यापिठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचे !
बरोबर पंचवीस महिन्यांपुर्वी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला होता .अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यामधून आणि तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधुन सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.
हा भव्य असा १२ फुट उंचीचा सावित्रीबाई फुले यांचा हा पुर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठ कॕम्पसमध्ये मुख्य इमारतीच्या आवारात उभारण्यात आला आहे.
कात्रज पुणे येथील परदेशी स्टुडिओमध्ये हा भव्य पुतळा बनविण्यात आला होता.
सावित्रीबाई फुलेंच्या या पुर्णाकृती पुतळ्याची किंमत काही लाख रुपयांमध्ये असून या कार्यक्रमामध्ये तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ,राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे ,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे , विरोधी पक्ष नेते देवेद्र फडाणवीस ,खा.गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ ,विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डाॕ.नितिन करमळकर ,प्र कुलगुरु डाॕ एन.एस.उमराणी , कुलसचिव डाॕ.प्रफुल्ल पवार ,पुतळा समितीचे अध्यक्ष डाॕ.संजय चाकणे व समता परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सावित्रीबाई फुलेंचा पुर्णाकृती पुतळा खुद्द पुण्यात उभारला जावा व तो ही पुणे विद्यापिठात ,विद्येच्या माहेर घरात , विद्येच्या मंदिराला सावित्रीबाई फुलेंचे नाव देऊन त्याच विद्येच्या मंदिराच्या मुख्य इमारतीसमोर जागेत बसवला जावा हा नियतिने सावित्रीबाईंच्या त्याग व कार्याला दिलेला न्याय होता ! या कृतीने भारतातील तमाम समतावादी जनतेला अत्यानंद झाला होता. तो सहाजिकच होता .कारण ज्या अतुलनिय अशा त्यागातून व परंपराधिष्ठित रुढींना आव्हान देऊन , प्रवाहाविरुध्द चालण्याचे धाडस सावित्रीबाईंनी दाखविले होते व त्यासाठी टोकाची निंदा-नालस्ती सहन केली होती ,सासऱ्यांनी घराबाहेर हाकलले होते . समाजाने बहिष्कार टाकला होता अशा ऐकाकी अवस्थेत केवळ म.जोतिबा फुले ,सगुणाबाई क्षिरसागर ,फातिमा शेख ,लहुजी बुवा उस्ताद व स्वतःची विवेकबुध्दी एवढ्याच जमेच्या बाजू घेऊन ज्या निष्ठेने त्या उभ्या राहिल्या होत्या व अतुलनिय मनोधैर्याने शिक्षण व समाज सेवेचे व्रत निभावले होते . सोबत अनाथ असलेल्या दत्तक मुलाचा सांभाळ करायचा होता ; सत्यशोधक समाजाचे कार्य व समतावादी विचारात खंड पडू द्यायचा नव्हता , मुली व महिलांना पुरुषी दास्यातून सोडवायचे होते . तशी खंबीर मानसिकता बनवून ,विश्वाविरुध्द लढण्याची ताकद एकवटून त्यांनी हे कार्य केले होते, त्यासाठी या गौरवावर त्यांचा हक्क होता, नियतीने तो त्यांना मोठ्या सन्मानाने बहाल केला होत,. मात्र त्यासाठी त्यांना १२५ वर्षे वाट पहावी लागली होती .
समाज कार्यकर्त्यांची सावित्रीबाईंच्या पवित्र कार्यावरील अपरिमित श्रध्दा व अनुकुल वेळ येण्यासाठीची प्रचंड सबुरी याचे ते फळ होते.
ज्या ज्या लोकांनी ,संस्थांनी व संघटनांनी, विचारवंतांनी ,सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समाजातील सर्व स्तरातील जाणकारांनी या सन्मानिय कार्यात आपापला खारीचा वाटा उचलला होता ; ती सर्व मंडळी व सामाजिक घटक हे सुध्दा अभिनंदनाला पात्र होते .
सावित्रीबाई फुलेंचा त्याग व कार्य एवढे महान आहे की , प्रत्येक शहरात, प्रत्येक विद्येच्या मंदिरात त्यांचा पुतळा उभारला तरी त्यांच्या त्यांच्या उपकारातुन उतराई होण्याचा आपला प्रयत्न कमीच पडेल !
” सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळा गावोगाव उभारला जावा ” या संकल्पनेतून आपल्याला ज्ञात आहे की, पुण्याबाहेरही काही गाव , शहर व राज्यांध्ये यापुर्वीच सावित्रीबाई फुलेंचे काही मोजके पुर्णाकृती पुतळा उभारले गेले होते ! पुणे विद्यापिठातील सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा हा त्या अर्थाने महाराष्ट्रातील व देशातील पहिला पुर्णाकृती पुतळा नव्हता.
हे सांगण्याचे कारण असे की, पुणे विद्यापीठात या पुर्णाकृती पुतळ्याचे भुमीपूजन पार पडले होते ; त्यानंतर दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी आॕनलाईन लोकमतने भावनेच्या भरात वा उत्साहात अशी बातमी दिली होती की ,
“पुणे विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशद्वारात उभारला जाणारा सावित्रीबाई फुलेंचा हा पुर्णाकृती पुतळा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पुर्णाकृती पुतळा असेल !” ( Marathi News पुणे > The first full size statute of Savittribai phule n the country will be erected atPune university .)
हे विधान थोडेसे वस्तुस्थितीला धरुन नव्हते .कारण सर्वात ही माहीती जेवढी अद्भूत व प्रेरणादायीआहे तितकीच ध्येयनिष्ठेने भारावलेली आहे, ती पुतळा उभारण्याची चळवळ होती आणि ती चळवळ धुळ्यात चालवली गेली होती .हाडाच्या समाजवादी कार्यकर्त्यां विजयाताई चौक यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ आजपासून पस्तीस वर्षांपुर्वी चालवली गेली होती.
सन्माननिय विजयाताई चौक यांचे पुत्र प्रा. प्रितम चौक सर व प्रख्यात गांधीवादी-सर्वोदयवादी विचारवंत सन्माननिय रमेश दाणी सर यांनी सादर केलेल्या महत्वपुर्ण पुराव्यावरुन मी हा लेख लिहित आहे. या विषयावर त्यावेळी श्री.रमेश दाणे सरांनी एक महत्वपुर्ण लेख लिहून या कार्याला शब्दबध्द केले होते .व या ऐतिहासिक परंतु दुलर्क्षित कार्याची नोंद इतिहासाच्या पटलावर सत्तावीस वर्षांपुर्वी कोरुन ठेवली होती.
त्या महत्वपुर्ण व ऐतिहासिक लेखात श्री.रमेश दाणी सरांनी म्हटले होते की , ‘ आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या प्रारंभी धुळ्यामध्ये महाराष्ट्रातील आगळे वेगळे असे स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला गेला होता . त्याचा पहिला टप्पा म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा पुर्णाकृती पुतळा दि.१० मार्च १९९७ रोजी उभारला गेला होता …’
हा धुळ्यातील सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा निदान महाराष्ठ्रातील तरी प्रथम पुर्णाकृती पुतळा होता व तो पुणे विद्यापीठात दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी अनावरण करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या किमान पाव शतक आगोदर उभारण्यात आला होता .
मला सांगायला आवडेल की , महाराष्ट्रातील स्त्री-जागृती विषयक व स्त्री-मुक्ती चळवळीची जेवढी केंद्रे त्याकाळी होती त्यात धुळ्यात समाजवादी महिला सभेचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते . सातत्याने क्रांतीची ,परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी विजयाताई चौक यांच्यासारख्या कार्यकर्त्या येथे सतत परिश्रम घेत होत्या .
कौटुंबिक छळ होणाऱ्या स्त्रियांपासून परितक्त्या , विधवा आदी सर्व स्त्रीयांचे प्रश्न विविध पातळ्यांवरुन विजयाताई चौक व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या अनेक वर्षांपासून मार्गी लावत होत्या . स्त्रीयांवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीला उखडून फेकण्याचे काम त्यांनी धुळे जिल्ह्यात केले होते .हुंडाबळी असो,जळीत स्त्री असो ,यांना न्याय देण्याच्या आणि गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी समाजातून उठाव घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊन स्त्रीयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या .परिणामी कामासाठी स्त्री निर्भयपणे बाहेर पडू लागली होती .सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळारुपी स्मारक उभारण्याची निकड विजयाताईंना याच कार्याच्या प्रेरणेतून निर्माण झाली होती .या पुतळारुपी स्मारकाकडे त्या चळवळीच्या अंगाने पाहात होत्या . त्याला चळवळीचे स्वरूप प्रदान केले होते .
पुतळे उभारुन कार्य होत नाही उलट पुतळा उभारला की , जबाबदारी संपली अशी समाजाची धारणा असते .मात्र धुळ्याच्या समाजवादी महिला सभेची भुमिका तशी नव्हती , पुतळा उभारुन त्यातून सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा घ्यावी आणि स्त्री उध्दाराच्या व्यापक योजना हाती घ्याव्या असा क्रांतीकारी संकल्प समाजवादी महिला सभेने व तिच्या नेत्या विजया चौक यांनी सोडला होता .
सोडलेला संकल्प कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी जी धडपड करावी लागते ती समाजवादी महिला सभा आणि विजयाताई चौक यांच्याकडून शिकावी एवढी कार्य आणि संकल्पनिष्ठा विजयाताईंमध्ये ठासून भरली होती .
विजयाताईंनी या पुतळा उभारणीला चळवळीचे स्वरुप देऊन धुळे शहरातील विविध क्षेत्रातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांना एका विचारपीठावर आणून स्मारकाची योजना मांडली होती . त्यासाठी ” क्रांतीज्योती फुले स्मारक समिती , धुळे ” या नावाची स्मारक समिती १९९६ साली खुद्गद विजयाताई चौक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली गेली होती .या समितीचा कार्यकाळ १९९६ ते १९९७ ऐवढा ,फक्त दोन वर्षांचा होता . हाती घेतलेले काम जिद्दीने व झटपट पुर्णत्वास नेणे हा विजयाताईंचा स्वभाव होतो .
१९९६ साली स्थापण करण्यात आलेली ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे होती .
अध्यक्षा – मान.विजयाताई चौक
सेक्रेटरी – श्री. रमेश दाणे
खजिनदार – प्रा.पी.डी.दलाल.
सदस्य – श्री. दशरथ तात्या
सौ. स्मिता भावसार-कुलकर्णी
प्रा.मु.ब.शाह
अॕड. प्रकाश परांजपे
श्री . बापू ठाकूर
काॕ. डाॕ.रा.भ. चौधरी
काॕ. भाई मदाने (संपादक व मालक दै. ‘आपला महाराष्ट्र )
श्री.निंबा खताळ
श्री. राम मोरे ,
त्याशिवाय तत्कालीन आमदार राजवर्धन कदमबांडे ,आ. जे . यु . ठाकरे , शिवाजीराव मराठे , ल. अ. कपोले , किशोर सोनवणे , रावसाहेब भंडारी तसेच सन्माननिय महिला कार्यकर्त्या मंदाताई घासकडबी, सुषमा दाते, सुलभा भानगावकर, अनुराधा गरुड, अश्विनी गरुड , मालती मराठे, रजनी कुलकर्णी ,वीणा जकातदार सुमन शिंपी, यांच्यासारख्या अनेक सदस्यांनी आणि सर्वसामान्य स्री-पुरुषांनी या सावित्रीबाईंच्या पुर्णाकृती स्मारक कार्यात सहभागी होऊन या पवित्र कार्यास पुर्णपणे योगदान देण्याचे मान्य केले, व त्या दिशेने प्रत्यक्ष कृतीशील सहभाग नोंदवायला सूरवात केली होती .
जागेचा प्रश्न होता ,त्यासाठी देवपूरातली जून्या मोठ्या ब्रिटिशकालीन पुलाशेजारच्या दलित वस्तीत असलेल्या रोहिदास उद्यानातली पुर्वेकडील दिशेची असलेली जागा मुकर्रर करण्यात आली. धुळे नगरपालिकेकडून तशी रितसर परवानगी प्राप्त करण्यात आली . यासर्व घडामोडी १९९६ सालातल्या होत्या . सर्वात महत्वाचा प्रश्न पुतळ्याचा होता. सावित्रीबाईंचा हा पुर्णाकृती पुतळा मुंबई -पुण्याच्या कमर्शियल आर्टिस्ट कडून बनवून घ्यावा का ? असा प्रस्ताव प्रथम पुढे आला होता. परंतु त्याला किमान दोन-अडीच लाख रुपयांचा खर्च होता अपेक्षित होता. मात्र हे काम चळवळीचं होते. धुळ्यातील सर्वसामान्य जनतेतून १९९६-९७ साली एवढा पैसा उभा करणे अवघड होते. त्याऐवजी एखाद्या सेवाभावी सस्थेतून पुतळा तयार करण्यात यावा; असा विचार श्री. रमेश दाणे सर व इतर मान्यवरांनी मांडला व तो सर्वानुमते मान्य करण्यात आला होता.
त्यासाठी खामगावच्या ” टिळक राष्ट्रीय विद्यालयाला ” हे काम देण्यात यावे असे विचारांती समितीने ठरवले . नफा जास्त न घेता कामाचा दर्जा अव्वल राखून ,त्यांना द्यायच्या पैशातून मुलांच्या शिक्षणाचा व भोजनाचा खर्च या विद्यालयाला भागवता येईल व तसे विधायक कार्यही सावित्रीबाई स्मारक समितीकडून घडेल, या हेतूने समितीतर्फे टिळक राष्ट्रीय विद्यालयाला ही पुतळ्याची आॕर्डर देण्यात आली होती .
खामगांवचे “टिळक राष्ट्रीय विद्यालय ” हे स्वातंत्र्य चळवळीचे जिवंत स्मारक म्हणून म.गांधीच्या प्रेरणेने २४ जानेवारी १९२१ रोजी स्थापण करण्यात आले होते. स्वराज्य ,स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व विदेशी वस्तुंवर बहिष्कार या चार तत्वावर या विद्यालयाचा कारभार चालत असे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना बलशाली ,निरोगी व आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी येथे हस्त कलेचे, कला-कुसरीचे, कारागीरी व शारीरिक शिक्षण दिले जात असे. स्वदेशी व राष्ट्रवाद ही या संस्थेची ओळख होती. आज शंभर वर्षांनंतरही विद्यालयाचे कामकाज याच तत्वाने सुरु आहे .
१९९६ साली विद्यालयातील कलावंत सुधाकर आजबे, त्यांचे सहकारी वसंत झाडोकर, हरिश्चंद्र गिरी यांच्या टिमने अवघ्या सहा महिन्यात सावित्रीबाईंच्या पुर्णाकृती पुतळ्याची उभारणी ब्राँझ धातूमध्ये कढा़ई करुन दिली होती, व केवळ ७५ हजार रुपयात सव्वा सहा फुटी पुर्णाकृती पूतळा या संस्थेने तयार करुन दिला होता. या पुतळ्याची किंमत पुण्या-मुंबईत १९९७ साली अडिच लाखापेक्षा कमी नव्हती. लोकभावनेचा आदर व चळवळीचे काम म्हणून राष्ट्रीय विद्यालयाने हे काम त्यांच्या तत्वानुसार करुन दिले होते. या पार्श्वभुमीवर धुळ्यातील अन्य पुतळ्यांचा खर्चही लाखोंच्या घरात (१९९५-९७ साली ) होता हे जनतेच्या व जानकारांच्या लक्षात आले होते .
धुळ्याच्या समाजवादी महिला सभेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतल्या मुलांपासून ते मोठ-मोठ्या व्यक्तींपर्यंत फक्त १-१रुपया गोळा करुन हा पैसा उभा केला होता. काही जाणकार ,समजदार व चळवळीचे मुल्य जाणणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून आपापल्या परिने या पुतळ्याच्या उभारणीच्या कामात आर्थिक योगदान दिले होते. सक्ती कोणावरही केली नव्हती. पुतळ्याची आॕर्डर दिल्यानंतर प्रख्यात समाजवादी नेत्या श्रीमती मृणाल गोरे यांच्या हस्ते या पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या जागेचे भुमीपुजन करण्यात आले होते .
पुतळा तयार झाल्यावर दि.१० मार्च १९९७ रोजी या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समाजकार्यात तोलामोलाचा वाटा असणाऱ्या प्रमिला दंडवते यांच्या हस्ते झाले होते. प्रसिध्द साहित्यिका शांता शेळके, डाॕ.अरुणा ढेरे , मृणालताई गोरे या यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. या कर्तबगार सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या साक्षीने धुळे शहरातील महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या या प्रकल्पावर व सावित्रीबाई फुलेंच्या कार्याच्या गौरवावर शिक्कामोर्तब झाले होते .
धुळ्याच्या समाजवादी महिला सभेने व त्या सभेच्या नेत्या विजयाताई चौक यांनी या स्मारकाच्या माध्यमातून भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे ठरविले होते. महिलांसाठी ‘सावित्री’ पुरस्कार योजना सुरु करण्यात आली होती. त्याशिवाय गृह कार्य करणाऱ्या करणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्योग प्रशिक्षण केंद्र, समृद्ध वाचनालय, मोफत कायदेशीर सल्ला केंद्र, विधवा -परितक्त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत योजना आणि आत्मरक्षणासाठी तरुणींना प्रशिक्षण देण्याची योजना व इतरही ऊपक्रम या स्मारकाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले होते. अशा या प्रकारचे बहुउद्देशीय असे महाराष्ट्रातील हे पहिलेच स्मारक होते.
तसेच धुळ्यातील सावित्रीबाई फुलेंचा पुर्णाकृती पुतळा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पुर्णाकृती पुतळा ठरला होता.
(गेल्याच वर्षी या पुतळ्याचे पंचवीस वर्षांनंतर नव्याने सुशोभिकरण करण्यात आले असून ते विद्यमान नगरसेवक आयु.नागसेन दामोदर बोरसे , वार्ड क्र.१७ ,धुळे महानगरपालिका ,धुळे यांच्या विकास निधीतून करण्यात आले आहे )
दरम्यान नांदेड येथे दि. ३ जानेवारी २०२१ रोजी व औरंगाबाद येथे १७ सप्टेंबर २०२१ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे पुर्णाकृती पुतळे उभारले गेले होते. पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची तारीख १४ फेब्रुवारी २०२२ आहे. म्हणजे नांदेड व औरंगाबाद येथील पुर्णाकृती पुतळे उभारल्यानंतरची ही घटना आहे .
तसेच, दक्षिण भारतातील एकट्या तेलंगणात सावित्रीबाई फुलेंचे शंभराहून आधिक पुर्णाकृती पुतळे हे २०११ ते २०२१ या कालखंडात उभारले गेले असल्याची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननिय सुकुमार पेटकुळे या सत्यशोधकाने मला दिली आहे. यातील सर्वच पुतळे मेटलचे नसून बरेचसे सिमेंट व प्लास्टिक पासुन तयार केलेले आहेत. परंतु ते सर्व पुर्णाकृती पुतळे आहेत. एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेला तेलंगणा आज सत्यशोधकांचा बनला आहे. उत्तर प्रदेश राज्यात सन्माननिय मायावतीदेवी या मुख्यमंत्री असतांना (१९९५ ते २०१२ या कालखंडात सुश्री. मायावती या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या होत्या ) त्यांनीही सावित्रीबाईंचे काही पुर्णाकृती पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते .
तेलंगणामध्ये जशी सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळे उभारण्याची चळवळ चालवली जात आहे, तशीच चळवळ महाराष्ट्रातही सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची एक अनोखी चळवळ आजपासून सुमारे २७ वर्षांपुर्वी चालवली गेली होती. त्या चळवळीतून आणि लोक सहभागातून जो सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा; पुणे विद्यापीठात उभारलेल्या पुर्णाकृती पुतळ्याच्या आगोदर किमान पाव शतकापुर्वी उभारला गेला होता.
( टिप – सन्माननिय संपादक व विचारवंत भास्कर सरोदे, युवा विद्यार्थीनी आयुष्यमती पुजा धावडे , श्री.प्रितम चौक सर,सन्माननिय विचारवंत, संपादक व सुप्रसिद्ध गांधीवादी – सर्वोदयवादी कार्यकर्ते रमेश दाणे सर तसेच तसेच तेलंगणाचे सत्यशोधक श्री.सुकुमार पेटकुळे यांनी दिलेली माहितीनुसार व प्रत्यक्ष पुरवलेल्या कागदपत्रांवरुन हा महत्वपुर्ण लेख तयार करण्यात आला आहे. या लेखाच्या निर्मितीत या सर्वांचा मोलाचा वाटा असल्याने मी हा संशोधनपर लेख लिहू शकलो आहे .म्हणून मी या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. राजाराम सूर्यवंशी )
साभार श्री राजाराम सूर्यवंशी