आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले.
हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अपर मुख्य सचिव दीपक मैसेकर, आयुक्त धीरजकुमार तसेच संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार हिमोफिलिया डे केअर सेंटरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड, माया आत्राम, अधिपरिचारिका सपना बावणे, विकास वाढई, दीपक डंबारे उपस्थित होते.
हिमोफिलिया रुग्णांस वर्षातून 10 ते 12 वेळा रक्तस्त्राव होण्याची संभावना असते व त्याकरीता फॅक्टर 7, फॅक्टर 8(अ) व फॅक्टर 9(ब) रुग्णास आवश्यकता असते. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 28 रुग्णांची नोंद झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हिमोफिलिया रुग्णास आवश्यकता असणाऱ्या घटकांचा तुटवडा पडू न देण्याचा मानस आहे, असे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी म्हणाले. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णांना अत्यावश्यक वेळी इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नसावी, याकरीता हिमोफिलिया सेंटर प्रत्येक जिल्ह्यात स्थापित केले आहे. यामध्ये प्रत्येक फॅक्टरची उपलब्धता असेल. पूर्वी या सुविधेचा लाभ घेण्यास रुग्णांना नागपूर येथे जावे लागत होते. मात्र, आता ही सुविधा चंद्रपूरमध्येच उपलब्ध झाली आहे. याचा उद्देश म्हणजे समुदायातील हिमोफिलिया असलेल्या व्यक्तींसाठी विशेष काळजी आणि समर्थन प्रदान करणे आहे. हा उपक्रम दुर्मिळ रक्तस्त्राव विकार आणि प्रभावित झालेल्या लोकांसाठी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी समर्पित आहे.
हिमोफिलिया रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा :
वैद्यकीय सेवा : हिमोफिलिया व्यवस्थापनामध्ये अनुभवी आरोग्य सेवा व्यावसायिक निदान, उपचार आणि देखरेख यासह सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे.
शिक्षण आणि समुपदेशन : रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिमोफिलियाची समज वाढविण्यासाठी तसेच परिस्थिती प्रभावीपणे हातळून त्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षण व समुपदेशन सेवा प्रदान करण्यात येते.
पोषक वातावरण : हिमोफिलिया केंद्रामध्ये एक पोषक वातावरण असेल जिथे रुग्ण इतर हिमोफिलिया रुग्णांशी संपर्क साधून आपला अनुभव शेअर करू शकेल.
आपत्कालीन प्रतिसाद : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सुसज्ज, केंद्र आपत्कालीन परिस्थिती त्वरित आणि कार्यक्षमतेने हाताळणे.
हिमोफिलिया डे केअर सेंटर मधील सुविधेचा लाभ घेण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड 8830875244 व अधिपरिचारिका सपना बावणे 7387714867 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी हिमोफिलिया डे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.