त्यांना राईट टू प्रायव्हसी नाही का ??? त्यांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे काय ???
संस्कृतीच्या नावाखाली आपण आपल्या सोयीच्या गोष्टी करत असतो. याबद्दलच मला खूप आक्षेप आहे!!!!
आधी पासून आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे असे ठसवले जाते, पण पुरुषाला प्रधान करण्यात सर्वात मोठा वाट उचलणारीचा कार्यभाग मात्र दुर्लक्षित आहे. जसा जसा यावर आक्षेप नोंदवणे सुरु झाले तसे पाहता पाहता काही अंशी चित्र पालटले आहे असे भासवले गेले, पण प्रत्यक्षात तसे अजिबात घडलेच नाही. पुरुष आणि महिला या समसमान आहे असे वारंवार भासवले जातेय, पण तो फक्त बनवलेला आभासच आहे.
सांगायला आपण २१ व्या शतकात वावरतो आहे पण ते फक्त फुटकळ कल्पनांवरच बरं का!! आज सरसकट सर्वांच्याच हातात मोबाईल दिसतात, अँड्रॉइड स्मार्ट फोन, पण ते वापरण्याची प्रायव्हसी सर्वानाच आहे असे नाही. घरातल्या सर्वच पुरुषांना वाटते कि घरातील महिलांच्या मोबाईल वर सुद्धा त्यांचीच मालकी आहे, मग ती महिला आई असो, पत्नी असो, बहीण असो कि मुलगी असो, सून असो किंवा प्रेयसी असो, मैत्रीण असो !! घरातील पुरुषांनी आपल्या मोबाइलला लॉक केले तर ती त्यांची प्रायव्हसी, परंतु तीच गोष्ट महिलांसाठी मात्र पब्लिक प्रॉपर्टी असते , असे का ?? घरातील महिलेच्या मोबाइलला लॉक नको, किंवा असल्यास “तो पासवर्ड घरातील पुरुषांना माहितीच असला पाहिजे असा सर्वांचाच अट्टाहास असतो” हे सरसकट बोलले कारण हे भारतातील ९९% महिलांच्या बाबतीत हेच घडतंय. १% केवळ अपवाद असू शकतील, हेच फार मोठे आमचे दुर्दैव आहे. सर्वाना खाजगीपणाचा अधिकार आहे अशा ग्रुप मध्ये बोलणारेच कळत नकळत किंवा जाणीवपूर्वक आपल्या घरातील महिलांच्या या अधिकाराचे हनन करतच असतात. प्रत्येक पुरुषाने स्वतः शी प्रामाणिक राहून या प्रश्नाचे उत्तर आपापल्या अंतरात्म्यास द्यावे, खरे खरे तिथे खोटेपणा नको !!
घरातील ती महिला कोणाशी किती वेळ बोलते, कोणाशी चॅट करते, काय बोलते, काय सांगतेय, याची माहिती पुरुषांना घ्यायची असते, पण तेच जर का पत्नी ने केले तर ” तुझा माझ्यावर भरोसा नाहीय का ? ” अशी भावनिक साद घालून महिलेलाच बुचकळ्यात टाकतात. हे सर्व कुठवर तुमच्या घरातील तिलाही खाजगीपणाचा पूर्ण अधिकार आहे. हे अजिबात विसरायला नक्कोय.
हे लिहिण्यासाठी मला माझ्या मैत्रिणीच्या प्रसंगाने बाध्य केले. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलगी आपली नवीन आयुष्यात रममाण होते, लग्न आधीचे मैत्री जीवन तिला पुरुषानं सारखे सुरु ठेवणे शक्य होत नाही. तसेच तिच्या बद्दल पण झाले, घरात तिच्याकडे नवऱ्याचा जुना अँड्रॉइड फोन, त्याला पासवर्ड नाही, कॉल केला असता तिचा फोन बिझी नको, असल्यास कोणाशी बोलत होती याचे इतिहासासह महाभारत सर्वाना सांगावे लागते, तिने फक्त माझ्याच घरच्याशी बोलायचे माहेरी कॉल केला तर तो आमच्या समोरच आमच्या अपरोक्ष नाही. मैत्रिणींना तर अजिबात करायचा नाही. घरातील कोणीही तिच्या मोबाईलचा पब्लिक फोन सारखा वापर करायचा, वैगरे खूप काही. काही महाभाग तर इतके परमोच्च असतात ते पत्नीच्या मोबाईलवरून सर्वाना तीच बोलत आहे असे भासवतात, तिच्या तर्फे स्वतः चॅट, मेसेज करीत असतात, ती मात्र आपल्या संसार टिकावा, अकारण वाद नको म्हणून सर्व निमूट पणे सहन करीत राहते, कारण तीच शिकवण जन्मापासून मनावर ठसवली असते.
असे पुरुषत्व गाजवणाऱ्या पुरुषांनी फक्त एक पूर्ण आयुष्य तिच्यासारखे जगून दाखवावे. करियर तिलाही आहे पण कुटुंब व्यवस्था अखंड असावी म्हणून ती सगळीकडे तडजोड करून भावना, मन मारून जगत असते, कुटुंबासाठी, कुटुंबातल्या सर्वांच्या ताठ उभे राहण्यासाठी ती खचत असते, तिच्या खाजगीपणाचा सन्मान करणे, आणि रक्षण करणे हि तुमची नैतिक जबाबदारी आहे, आणि ती पुरुष म्हणून तुम्हीच पार पडली पाहिजे, जर ती साधी जबाबदारीही तुम्ही पार पाडू शकत नसाल तर तुम्ही पुरुषच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. आणि तुम्ही तिचे, तिच्या खाजगीपणाचे, विचारांचे, मान, सन्मानाचे रक्षक पुरुष आहात, हि प्रामाणिक भावना तिच्या मनात निर्माण होईल असे तर तुम्ही नक्कीच वागू शकतात.
अश्या सर्व “त्यांच्या ” साठी मी महिला असूनही तो रक्षक पुरुष व्हायची तयारी आहे, तुमची आहे का????