‘गाळमुक्त धरण’ उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा उपक्रम राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे. यात धरणातील गाळ काढून शेतामध्ये टाकण्यात येणार आहे. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध संस्थांकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील ४७ तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात. संबंधित संस्थांना कार्यारंभ आदेश तातडीने देण्यात यावे. तसेच संस्थांनी गाळ काढण्याची कामे विनाविलंब सुरू करावीत.
गाळ काढण्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. तसेच हा गाळ शेतीमध्ये टाकण्यात आल्यामुळे सुपिकता वाढणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे. तलावातील गाळ शेतामध्ये नेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. गाळ घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी आपली शेती सुपिक करावी, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी लवकर ही कामे सुरू करून सायंकाळपर्यंत गाळ काढण्यात यावा. परिसरातील नागरिकांना या गाळ काढण्याच्या उपक्रमाची माहिती घ्यावी. त्यांचा यामध्ये सहभाग घेण्यात यावा. येत्या काळात पावसाळ्याचे दिवस असल्याने ही कामे निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.