( एकदा निवडलेला जोडीदार ,मित्र, किंवा प्रियकराला आपण त्याच्या गुण-दोषांसह स्विकारायला हवां ,तरच आपली निवड आपल्यासाठी योग्य ठरते.
भारतात पहिल्यांदाच विवाहबद्ध झालेल्या गतीमंद अनन्या आणि विघ्नेशची ही काहणी आपल्याला हेच शिकवते.)
– दादा तुला काही फोटो टाकलेयत बघ,मंदार Mandar Doulat Bhoir ने वॉट्सप केलं आणि मी घाई घाईने ते फोटो बघितले , सुरवातीला मला वाटलं नेहमी प्रमाणे त्याने कुठेतरी फोटोशूट केलं आणि मला पाठवलं, मी फोन करून मंदारला म्हटलं छान आले फोटो तर तो म्हंटला हे केवळ फोटो नाहीयत एका लग्नाची गोष्ट आहे ,मी उतुसक्तेन पुन्हा ते फोटो नीट बघितले आणि माझ्या लक्षात आलं मतीमंद तरुणांनी लग्न केलंय .ही घटना आपल्या देशात पहिल्यांदाच घडली होती , मी मंदारला म्हटलं मला भेटायचंय त्यांना आणि त्याने लगेच भेट घडवून आणली
सगळ्यात आधी मला अनन्याची आई भेटली ,डॉक्टर तेजस्विता.
या जगात एखाद्या स्त्रीने किती धिरोदत्त असायला हवं ते तेजस्विता यांच्या एका भेटीतच तुम्हाला कळेल , मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या टिव्ही स्क्रीनवर आपली मुलगी अनन्या आणि जावाई विघ्नेशचे फोटो शूट बघत होत्या, 20 वर्ष ज्या मुलीला तळहातावर जपलं ती एव्हढी मोठी झाली तिचं लग्न झालं आणि आता ती सासरी जाईल हा सगळा प्रवास त्यांच्या डोळ्यात दाटून आलेल्या अश्रुंमध्ये दिसत होता , थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं आणि त्या माझ्याशी बोलू लागल्या
Sorry..
अनन्याचं काल लग्न झालं ती आता दुबईला जाईल पण तिच्या आठवणींनी घर भरलं आहे आमचं आयुष्य तिच्याशिवाय शून्य आहे , आम्हाला अनन्या आणि अष्णी ह्या दोन मुली, अनन्याचां जन्म झाला तेव्हा आम्ही खूप आनंदात होतो पण काहीच दिवसात आम्हाला ती गतिमंद असल्याचं कळलं आणि आम्ही दोघेही हताश झालो पण मी त्याच वेळी ठरवलं अनन्याला जगातले सगळे आनंद द्यायचे तिला शालेय शिक्षण तर दिलंच , पण मला वाटते ती गतिमंद मुलींमध्ये भारतातील पहिली वाहन चालक असावी एव्हढच नाही तर ती एक वर्ष आमच्यापासून वेगळी राहत होती जेवण बनविण्यापासून ते दैंनदिन सगळी कामे एकटीच करायची तेव्हाच मला विश्वास आला की ती आता विवाहयोग्य झालीय
मग आम्ही अनन्यासाठी मुलगा शोधायला सुरवात केली तेव्हा आम्हाला धक्का बसला मागचे तीन दशकं आम्ही नवरा बायको गतिमंद मुलांसाठी काम करतोय आमची संस्था आहे पण आम्हाला कळलं की गतिमंद मुलांसाठी एकही विवाह संस्था काम करत नाही किंवा लग्नच लावली जात नाहीत, मग मी ठरवलं हे आपण करायचंच आणि एका online खासगी विवाह संस्थेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला आणि बऱ्याच विनंती नंतर त्यांनी down syndrome विवाहसाठी नोंदणी सुरू केली ,काही दिवसातच विघ्नेशच्या कुटुंबीयांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही दोन्ही कुटुंब तब्बल 1 वर्ष भेटत राहलो.
एके दिवशी अनन्या आणि विघ्नेश समुद्रात खेळून आल्यावर बीचवर बसले तेव्हा अनन्या विघ्नेशच्या पायाला लागलेली वाळू काढत होती ते दृश्य आम्ही दुरून बघितलं आणि नकळत माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले मला कळलं होतं अनन्याला आता तिचा साथीदार मिळाला आहे तो तिची काळजी घेईल आणि तिथेच आम्ही लग्नाची तारीख ठरवली
लग्नाचा दिवस उजाडला, मी जी मेहनत घेतली ती आज मूर्त स्वरूपात दिसणार होती कारण अनन्याच्या लग्नात मी जे करायचं ठरवलं होतं ते आज मला दिसणार होतं
आणि तसच झालं मी अनन्याच्या लग्नाला आमच्या कोणत्याच नाते वाईकाना बोलवलं नव्हत तर आमच्या संपर्कात आणि संस्थेशी जोडल्या गेलेल्या 300 कुटुंबीयांना आमंत्रित केलं होतं आणि हे तेच कुटुंबीय होते ज्यांची मुलं #down_syndrome म्हणजेच गतमिंदतेने ग्रस्त होते
जे पालक आपल्या मुलांची परिस्थिती बघून नेहमी हताश व्हायची ते सगळेजण त्या दिवशी नाचत होती, त्यांना नवी ऊर्जा तर मिळालीच होती पण प्रत्येकजण म्हणत होता आम्ही आज पाहिलेला विवाह देव विवाह होता .
पुढे अनन्याचे वडील बोलू लागले…
बाप म्हणून आत्ता माझ्या मनाची काय घालमेल होतीय ते मी तुम्हाला सांगू शकतं नाही,
माझ्या आयुष्यात मी कुणाचही कधीच वाईट केलं नव्हत तरीही देवाने मला अनन्या सारखी मुलगी दिली जी आयुष्यभर एखाद्या लहांमुलासारखी राहणार आहे याच दुःख मला कायम व्हायचं पण आज मी देवाचे आभार मानतो की अनन्याचा वडील होण्याचं भाग्य त्यांनी मला दिलं ,मी जगातला सगळ्यात भाग्यवान बाप आहे कारण फक्त अनन्या मुळेच मला इतरांवर प्रेमकरायचं कळलं , पुढे मला ते म्हणाले तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती सांगू शकाल का ज्याने तुम्हाला मागच्या 20 वर्षात कधीच दुखवल नाही, तुम्ही नाही सांगू शकणार पण मी सांगू शकतो माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे अनन्या .तिला फक्त प्रेमाची भाषा कळते मुळात ही सगळी मुलं गतिमंद नाहियत तर ती स्पेशल चाईल्ड आहेत ,त्यांना जगातील द्वेष अजिबात कळत नाही तुम्ही रागावला की ते आतल्या आत मरून जातात पण तुम्हाला उलट कधीच बोलत नाहीत आणि तुम्ही प्रेम करता तेव्हा त्यांच्यासाठी काहीही अशक्य नसते
अनेक पालक आपल्या अशा मुलांना एकतर प्रश्न विचारतात की तू आज काय केलं, काय खाल्लं किंवा त्यांना आदेश देतात हे कर ते कर पण त्यांनी मुलांसोबत खेळायला हवं , पोहायला फिरायला न्यायला हवं दुर्दैवाने अनेक पालक मुलांना मोबाईल देतात आणि आपल्या नशिबाला कोसत बसतात
आज अनन्या शिक्षिका आहे ती मुलांना ट्रेन करते तर माझा जावाई विघ्नेश एका कंपनीत 5 वर्षांपासून काम करतोय तो स्वतःच्या पायावर उभा आहे अनन्याचे वडील दोघांचंही कौतुक करतांना थांबतच नव्हते, सगळी दुखः एकवटून काळजाच्या एका कोपऱ्यात गाडून त्यावर खंबीरपणे उभा असलेला बाप काय असतो ते अनन्याचे वडील गिरीष यांना एकतांना कळत होतं
अनन्याची बहिण तर म्हणाली मला होणारं मुल गतीमंदच व्हावं तिच्या बोलण्या मागे तिने अनन्याचां 20 वर्ष पाहिलेला निरागसतेचा आणि नात्यासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या बहिणीचा प्रवास होता.
आमच्या गोष्टी दोघेही म्हणजे अनन्या आणि विघ्नेश खूपच संयमाने एकत होते , अर्थातच दोघानाही काय चाललय हे कळत नव्हत, पण जेव्हा अनन्या आणि विघ्नेशला विचारलं तुम्ही दोघे एकेमकांसाठी कोण आहात?तेव्हा दोघेही लाजले अनन्या ईज माय वाईफ असं म्हणत विघ्नेश ने तिचा हात पकडला तो शेवटपर्यंत साथ देण्यासाठीच आणि अनन्या तर विघ्नेशला आपलं सर्व काही मानून बसलीय,तो एक सेकंदही दूर गेलेला तिला चालत नाही
त्यांचं दोघांचं लटकं भांडण ,लगेच एकेमकांच्या गळ्यात पडणं ,निरागस हसणं , ओरडणे, रुसणे आपण फक्त बघत राहावं आणि बघतच रहावं ….
पुढे या दोघांचं वैवाहिक आयुष्य कसं असेल?त्यांच्या वेलीवर फुलें बहरतील का ? त्यांना एकमेकांची काळजी घेता येईल का?प्रवास कसा करतील ,काय खातील असे शेकडो प्रश्न दोघांच्याही आई वडलांना आहेत मात्र सगळ्यांना एकच विश्वास आहे दोघेही कायम एकत्र राहतील.
बाकी
आपण अनन्या आणि विघ्नेश सारखं निखळ प्रेम करूच शकत नाही आपल्या प्रेमात स्वार्थ असतो काहीतरी मिळवीण्याची अपेक्षा असते अनन्या आणि विघ्नेशच्या प्रेमाच्या व्याखेत आपण बसत नाही कारण आपली प्रेमाची व्यापकता खुजी आहे खूप खुजी ….एव्हढी खुजी की ती पुस्तकी ज्ञान आणि मानवी सल्ल्यांच्या पलीकडे जाऊच शकत नाही
थोडक्यात काय तर
कुणाच्या तरी सांगण्याने ,पुस्तके वाचून, काहण्या एकूण चित्रपट पाहून आणि कशाच्याही प्रभावाने व्यक्तीवर निर्माण झालेलं प्रेम हे कधीच प्रेम नसते तर ती असते केवळ एक वासना.
मात्र कुणाच्याही प्रभावाखाली न येता तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर निश्चिंत रहा तुमची प्रेम खरं आहे कारण तुमची प्रेमगाठ देखील स्वर्गातच बांधली गेलीय.
साभार- गोविंद अ. वाकडे