कोरेगावातील भाताच्या ५२ वाणांची जपवणूक करणारी बीयांची बँक!
पोलीस डायरी प्रतिनिधी, कोरेगाव तालुक्यातील अंभेरी गावात एक सुंदर उपक्रम चालू आहे. फार्मर कपच्या श्रीनंदी सेंद्रीय शेतकरी गटाने भाताच्या नामशेष होत चाललेल्या वाणांची बीयांची बँक तयार केली आहे. त्यांनी जानेवारी – मे महिन्यात ५२ प्रकारची भाताची वाणे शोधली. महाराष्ट्रातील लागवड करनाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली सुद्धा.
या उपक्रमासाठी गटाने सह्याद्री डोंगररांगातील खूप दूरवरच्या गावात जावून शोध घ्यावा लागला. गटाने जमा केलेल्या वाणांत दोडाक, कोळंबा, नागकेशर, आंबेमोहर, काळी साळ इत्यादी व इतर जातींचा समावेश आहे. आतापर्यंत गटाने २००० किलो इतक्या वेगवेगळ्या बियाण्याची विक्री केली आहे.
या गटाचे सदस्य अनिल निकम म्हणतात, “आमच्या गावात आधी भरपूर शेतकरी भातशेती करायचे. पण आता फक्त काहीच शेतकरी करतात. विशेषतः सगळीकडेच गावरान भातांची लागवड खूपच कमी झाली आहे. ही बाब मला खूप खटकते. म्हणून मी स्वतः भातशेती करण्याचा निर्णय घेतला आणि या उपक्रमाची सुरुवात केली.”
हा गट पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गतदेखील नोंदवला गेला आहे. यातून कृषी विभागांतर्गत सेंद्रीयशेती संबंधित अनेक प्रयाेग गट करत आहे.