मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी द्यावी,असे आवाहन कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे.
यासंदर्भात उद्योग उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. निवडणूकीच्या दिवशी हे कामगार निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांनाही सुटी देण्यात यावी. सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, संस्था, औड्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांना ही सुटी लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन तासाची सवलत देण्यात यावी. त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना दोन तासांची सवलत मिळेल व कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी. १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी सोमवार दि.१३ ओजी मतदान होणार आहे. या क्षेत्रातील कार्यरत उद्योग, खाजगी आस्थापना, उदद्योग समूह, महामंडळे. कंपन्या संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना सुटी द्यावी. या संदर्भात उद्भवणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून कामगार, कामगार संघटनांनी ०२४०-२३३४६०३ वर संपर्क साधावा,असे आवाहन कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे.