पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर : परिपूर्ण लोकशाहीसाठी त्यात महिलांचा सहभाग आवश्य आहे. महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावतांना आपल्या कुटूंबातील आपल्या परिसरातील लोकांनाही मतदान करण्यास प्रेरित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
१०८ औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा मेळावा आज सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, तहसिलदार रमेश मुनलोड, माविम प्रकल्प संचालक चंदनसिंग राठोड, गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्राच्या विकासात महिलांचा सहभाग कितपत आहे यावर अवलंबून आहे. महिलांना अबला समजू नये,त्या सबला आहेत. बुद्धी, शक्ती,आर्थिक असे सर्व सामर्थ्य महिलांपाशी आहे. उलट पुरुष हे महिलांच्या आधाराशिवाय पुढे जाऊ शकत नाही. विकसित आणि सामर्थ्यवान लोकशाहीसाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानातही महिलांचा सहभाग आवश्य आहे. मतदानाचे प्रमाण हे परिपूर्ण लोकशाहीसाठी आवश्यक आहे. महिलांनी स्वतः तर मतदान करावयाचे आहे. शिवाय आपल्या कुटुंबाचे, शेजारी, आपल्या भागातील लोकांनाही मतदान करण्यासाठी सांगावयाचे आहे. एकदा स्त्री शक्तीने निर्धार केला तर नक्कीच मतदानाचे प्रमाण वाढणार,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी मिनाक्षी राऊत व ज्योती घोरपडे या महिलांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अर्चना खेतमाळीस यांनी केले. जयश्री चव्हाण व सुदर्शन तुपे यांनीही उपस्थित महिलांना संबोधित केले. त्यानंतर हम मतदार है या गीतावर नृत्य सादर झाले. उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. रोहिणी पिंपरखेडकर यांनी सूत्रसंचालन तर दीपाली थावरे यांनी आभारप्रदर्शन केले.