पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दीसाठी जिल्हयातील नोंदणीकृत पथनाट्ये/ कलापथक संस्थांनी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव दरपत्रकासह 15 जानेवारीपर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.
कार्यालयाला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दी करणे या बाबीसाठी निधी मंजूर आहे. जिल्ह्यामध्ये कलापथक सादर करण्यासाठी कार्यालयाकडून पथनाट्ये /कलापथक संस्थांची निवड करण्यात येत आहे. निवड झालेल्या कलापथक/पथनाट्ये संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची सर्वांना एकसमान या तत्वाने संधी देण्यात येणार असून त्यासाठी योग्य ते मानधन देण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील कलापथक/पथनाट्ये संस्थांनी कार्यालयाकडे पुढील कागदपत्रे 15 जानेवारी पर्यंत व्यक्तीश: सादर करावीत.
संस्था नोंदणीकृत असल्यास त्याची कागदपत्रे , संस्था किती वर्षापासून कार्यक्रम करीत आहे त्याचा तपशील व पुरावे, संस्थेने एका वर्षात सरासरी किती कार्यक्रम सादर केले आहेत, त्याबाबतची माहिती व पुरावे, शासकीय योजनांसाठी कार्यक्रम केल्याचे अनुभव वर्षे/संख्या, आकाशवाणीवर कार्यक्रम केल्याचा अनुभव वर्षे/संख्या व त्याबाबतचे पुरावे, केंद्र शासनाच्या गीत व नाट्य प्रभाग यांच्या यादीवर पथक आहे का, किंवा पुर्वी होते का, असल्यास याबाबतचा पुरावा, संस्थेच्या पथकातील सहभागी कलाकारांची कला क्षेत्रातील पूर्व अनुभव (वर्ष/व्यक्तीगत सादरीकरण संख्या), पथकाला/पथकातील कलाकारांना मिळालेले शासकीय अथवा प्रथितयश पुरस्कार याबाबतचा पुरावा, पथकातील सर्व कलावंतांची नावे व पत्ता आधार क्रमांक व ई-मेल आयडी आदी माहिती प्रस्वावासोबत सादर करावा.कोणत्याही स्तरावर ही प्रक्रीया रद्द करण्याचे अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय स्वत:कडे राखून ठेवत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जयस्तंभ, रत्नागिरी दू.क्र. ०२३५२-२२२३२५ अथवा २२०९५३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा