चंद्रपूर,दि. 7 : राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्य होत नाही. सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने दि. 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज करताना संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. अर्जदारांनी प्रथमतः युजर नेम व पासवर्ड तयार करून आपले खाते उघडावे. त्यानंतर पुन्हा लॉगिन करावे. सिंचन साधने व सुविधा या टायटल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. तदनंतर शेततळ्याचे आकारमान व स्लोप निवडण्यात यावा. याप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थी शेतकरी महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने निवडीची कार्यवाही सिस्टीमद्वारे करण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज भरतांना इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. जेणेकरून, सोडतीमध्ये अर्ज रद्द होणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावर यांनी कळविले आहे.