पो.डा. वार्ताहर , परभणी : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्यामार्फत (दि. 09 डिसेंबर) रोजी जिल्ह्यातील संबंधित न्यायालय परिसरामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी दिली आहे.
या वेळी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची तडजोडपत्र, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881 चेक बॉउन्स, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, विज (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे तसेच बँकेची वसुली वादपुर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार असुन तडजोडीअंती जास्तीत-जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मा. न्यायाधीश व वकील यांचे पॅनल मदत करणार आहे. तसेच यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी ज्या न्यायालयात आपली प्रकरणे/केस आहे तेथे अर्ज करावा. सोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती येथे 09 डिसेंबर, 2023 पुर्वी अर्ज करुन माहिती देणे गरजेचे आहे.
लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट-फीची रक्कम परत मिळते. प्रकरण/केसचा निपटारा त्याच दिवशी होत असल्याने आपला वेळ व पैसे याची बचत होते. दोन्ही पक्षकार मा. न्यायाधीश यांच्या समक्ष चर्चा करुन प्रकरण/केसचा निपटारा करु शकतात. त्यामुळे कटुताही निर्माण होत नाही. आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे जास्तीत-जास्त ठेवुन तडजोडीअंती निकाली काढण्याचे आवाहन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांनी केले आहे.