पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24मध्ये संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी आणि कोकणातील आंबा आणि काजू फळपिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता यावे, यासाठी कोकणातील आंबा, राज्यातील काजू, व संत्रा आणि रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने 05 डिसेंबर2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी फळ पिकांसाठी 05 डिसेंबर 2023 पर्यंत विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 असा नियमित आहे तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम 15 डिसेंबर 2023 राहणार आहे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.