पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर :- घरपोच गॅस सिलिंडर देतांना गॅस वितरकांनी सिलिंडर वजन करुन द्यावे व त्यासाठी घरपोच वाहनांमध्ये वजन काटा ठेवावा, ग्राहकांनी मागणी केल्यास वजन करुन त्यांचे शंका निरसन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरक, एजन्सीधारक यांना दिले.
जिल्ह्यातील गॅस वितरक, एजन्सीधारक, डिलर्स यांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, गॅस कंपनीचे विक्री अधिकारी प्रगती लाड, निलेश लठ्ठे, गोविंद पटेल तसेच सर्व गॅस वितरक आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी लोखंडे म्हणाले की, ग्राहकांना गॅस सिलिंडर देतांना ग्राहकाने मागणी केल्यास त्यास सिलिंडर वजन करुन द्यावे, ग्राहकाचे शंका निरसन करावे. गॅस सिलिंडर साठी ‘बुकिंग ते प्रत्यक्ष वितरण’ ही प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. त्या प्रत्येक पातळीवर ‘एसएमएस’द्वारे ग्राहकाला माहिती जाणे बंधनकारक आहे. तसेच वितरण वाहनावर तक्रार निवारणाचे टोल फ्री क्रमांक देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती भोसले म्हणाल्या की, ग्रामिण भागात गॅस सिलिंडर घरपोच डिलिव्हरी होत नसल्याच्या तक्रारी आहेत, त्या वितरकांनी दूर कराव्या. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना सिलिंडर वाहून न्यावे लागू नये, असे त्यांनी सांगितले.
गॅस सिलिंडर हवे असल्यास ग्राहकांनी केवळ मिस कॉल दिला तरी बुकींग होऊ शकते. त्यानंतर ज्यावेळी एजन्सीतून सिलिंडर डिलिव्हरीसाठी आणले जाते तेव्हा ग्राहकाला एसएमएस दिला जातो. प्रत्यक्ष सिलिंडर डिलिव्हरी करतांना ग्राहकाला एक कोड येतो तो ग्राहकाने डिलिव्हरी कर्मचाऱ्यास दाखवायचा असतो जेणे करुन ज्या ग्राहकाने बुकींग केली त्या ग्राहकासच सिलिंडर दिले जात आहे याची पडताळणी होते. या व्यतिरिक्त ग्राहकाने सेवेबाबत तक्रार असल्यास एजन्सीकडे ती नोंदवावी, अशी सिलिंडर वितरणाची कार्यपद्धतीची माहितीही यावेळी देण्यात आली.