चंद्रपूर, दि. 5 : बाजारात बोगस कंपन्या, खाजगी व्यक्तींमार्फत परवाना नसलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशाप्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.
याप्रकारची बियाण्यांची लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले असून एचटीबीटी आढळ्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचटीबीटी बियाणे आढळल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबत कृषी विभाग व पोलीस विभाग सतर्क असून, एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन असल्याने कोणीही सदर बियाणे विक्रीचा प्रयत्न करू नये. याप्रकारचे अनधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या, खाजगी एजंट, खाजगी व्यक्ती प्रलोभने दाखवतील त्यास बळी पडू नये, फसवणूक होऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.
बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी :
बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना असणाऱ्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी, टॅग इत्यादी जपून ठेवावी. पाकिटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवणशक्ती इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे पॉकीट योग्य वजनाचे असल्याबाबत खात्री करावी. पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. कोणीही शेतकऱ्यांना एचटीबीटी असे अप्रमाणित बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास 9561054229 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे चंद्रपूर कृषी विभागाकडुन कळविण्यात आले आहे.