पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विसापूर येथील सैनिक स्कूल व बॉटनिकल गार्डनला सिंगापूरचे कौन्सल जनरल विंग फूंग चाँग आणि हाय वे वून यांनी भेट दिली व संपूर्ण परिसराची पाहणी केली.
यावेळी त्यांनी सैनिक स्कूल परिसरातील विविध खेळांचे स्टेडीयम, स्थलसेना, नौसेना, वायुसेनेचे लष्करी म्युझियम, 16 डिसेंबर 1971 रोजीचा बांगलादेश मुक्ती कराराबाबतचा देखावा, उरी सेक्टर सर्जिकल स्ट्राईक देखावा, विविध विमानांचे मॉडेल, वेगवेगळ्या युध्दांची माहिती असलेले फलक, कारगील युध्दाचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार असलेला देखावा, दिल्ली – लाहोर बस यात्रेचा देखावा आणि सोबतच भारतीय लष्कराने केलेल्या विविध पराक्रमाचे देखावे बघून प्रसन्नता व्यक्त केली. सैनिक स्कूलच्या विविध उपक्रमाबाबत स्कूलचे प्राचार्य तथा लेफ्टनंद कर्नल संजय पटियाल, ॲडमिन ऑफिसर देबाशिष जेना यांनी माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कौन्सल जनरलचे संपर्क अधिकारी आर.पी. सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, तहसीलदार विजय पवार, सैनिक स्कूलचे प्रणव यंगलवार, नितीन पंधरी, निवृत्त सुभेदार अरुण शेषकर, नौशाद शेख आदी उपस्थित होते.
बॉटनिकल गार्डनला भेट : यावेळी सिंगापूरचे कौन्सल जनरल विंग फूंग चाँग आणि हाय वे वून यांनी बॉटनिकल गार्डनलासुध्दा भेट दिली. येथील अंडरग्राऊंड म्युझियम, सायन्स पार्क, बटरफ्लाय गार्डन, वृक्ष संवर्धन क्षेत्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी परिसरात वृक्षारोपणसुध्दा केले. यावेळी मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू व इतर मान्यवर उपस्थित होते.