सुतक काय असते? सुतक किती दिवस आणि कसे पाळायचे असते? धार्मिक आणि वैज्ञानिक माहिती
पोलीस डायरी, नाशिक प्रतिनिधी,
सुतक ही हिंदु धर्मातील एक प्रक्रिया आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं. सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते.
बाहेरगावच्या माणसांसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच मृत व्यक्तीबद्दल धरावयाचा विटाळ. सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस अशौच पाळण्याची पद्धत आहे.
सुतक पाळायचे नियम
सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये.
कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.
आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ, वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.
नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये. सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.
दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये. अत्तर किंवा सेंट वापरू नये.
नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.
अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.
या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे. (आता बऱ्याच ठिकाणी ११व्या दिवशी सर्व कार्यक्रम पूर्ण केले जातात)
तेराव्या दिवशी (काही ठिकाणी हा विधी १४ व्या दिवशी करतात) घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपर्णे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरने तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.
– या लोकांना सुतक नसते
मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने, विष पिऊन, पाण्यात उडी घेऊन, फाशी घेऊन, पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इ. कारणाने मृत झाले असता किंवा आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नसतं.
तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये. नास्तिक, नीच कर्म करणारे, पितृकर्म न करणारे अशा लोकांकडे जेवण सुद्धा करू नये तसेच पाणी सुद्धा पिऊ नये.
संदर्भ : निर्णयसिंधू, गरूड पुराण
विविध ठिकाणी परंपरेनुसार पाळले जाणारे नियम –
(कुटुंब,समूह त्यांच्या धारणा आणि पद्धतीनुसार बदल होतो )
व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरूषाने तिलक किंवा टिकली लावू नये. घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाही. शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केलं जातं. घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाही.
सुतकामध्ये केस व दाढी कापत नाही. सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूनाही असते.
सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही. दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते. दहावा झाल्यानंतर सुतक फिटलं जातं. दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरूष व्यक्तींचा केश वपन केल जाते.
दहावा झाल्यानंतर तिसर्या दिवशी तेरावा विधी केला जातो. तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलावतात आणि गोडधोड खायला केलं जातं.
या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरूष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराच सुतक संपत. स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरू करतात.
दाह संस्कार करून आलेल्यांची घरी गेल्यावर अंघोळ का करावी?
शास्त्रात सांगितले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता, चैतन्य लोप पावलेलं असतं तसेच स्मशानातही होणारी कार्यं ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात. येथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करून राहते. या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेलं असतं. या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे. स्नान केल्यावर आपोआप शूचिर्भूत झाल्यासारखे वाटते त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे.
तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरूवात होते आणि त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात. स्मशानातील वातावरणातही अशा किटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते. या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये यामुळे स्नान करून स्वच्छ होणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.