ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
पो. डा. वार्ताहर : नागपूर शहरातील मौजा वाठोडा व मौजा भांडेवाडी ह्या भागातील प्पुरग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणामध्ये असलेला गोंधळ तातडीने दूर करून बाधितांना सानुग्रह मदत द्या, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
पुरग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींच्या संदर्भात ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवारी (ता.३) उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देखील निवेदनाची प्रत पाठविलेली आहे.
ॲड. मेश्राम यांनी निवेदनात नमूद केले की, प्रभाग क्र. २६ येथील मौजा वाठोडा मधील संघर्ष नगर झोपडपट्टी, चांदमारी नगर, वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर या नाल्याच्या काठावरील वस्त्यांमधील पुरग्रस्त रहिवाश्यांचे सर्वेक्षण अद्यापही झालेले नाही. सर्वेक्षणाच्या यादीत या विशिष्ट वस्त्यांची नावे नसल्याचे सांगून प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षणास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यासोबतच न्यू सुरज नगर, सुरज नगर, अंतुजी नगर या कचरा डम्पिंग परिसरातील मौजा भांडेवाडी या वस्त्यांच्या संदर्भाने देखील गोंधळ आहे.
पुरग्रस्त भागातील रहिवाश्यांच्या सर्वेक्षणातील हा गोंधळ दूर करून प्रशासनाने वस्तीनिहाय सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे, अशी मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवेदनातून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.