*17 कोटींची मदत होणार वितरीत
पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांपैकी ईकेवायसी झालेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पिक नुकसानीसाठी 71 हजार 545 लाभार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे. यात डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरीत 224 लाभार्थी, ऑक्टोबर 2021 मधील मेहकर तालुक्यातील 7 हजार 641 लाभार्थी, जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 66 हजार 931 लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आला आहे. तसेच येत्या काळात 62 हजार 854 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. तसेच एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या 826 लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.
12 हजार एपीएल कार्डधारकांना डीबीटी द्वारे 54 लाख रूपयांचा लाभ देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 15 हजार 936 विविध प्रकारचे दाखले आणि एकाला अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह, महिला बाल कल्याण विभागातर्फे पिठाची गिरणी, शिलाई मशिन, प्रादेशिक मोटार परिवहन विभागातर्फे दिव्यांग व्यक्तीला मदत देण्यात येणार आहे.
कृषी विभागातर्फे अपघातग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना दहा लाख रूपयांचा विमा संरक्षण निधी देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणात 195 लाभार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 47 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील 1 हजार 192 लाभार्थींना 5 कोटी 41 लाख 27 हजार रूपये देण्यात येतील. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 3 हजार 134 लार्थींना 3 कोटी 24 लाख रूपयांचे वाटप करण्यात येतील. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत 1 कोटी 64 लाख 78 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, ड्रोन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तीक शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून पीएमएफई, एमकेएपीपीजी फंड, सीआयएफ बी लिंकेज, आदिवासी विकास विभाग, कामगार विभाग विभागातर्फे शैक्षणिक कल्याण, सामाजिक कल्याण, सुरक्षा संच, जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्थसहाय्य, नगर परिषद बुलडाणातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात 25 लाख 50 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पीएम स्वनिधीचे वाटप करण्यात येणार आहे.
बुलडाणा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारार्थीं, जिल्हा अग्रणी बॅकेतर्फे पीएमएफएमई, मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र या 31 लाभार्थ्यांना 4 कोटी 17 लाख 14 हजार रूपये वाटप करण्यात येणार आहे.