पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : नेहरु युवा केंद्र आणि सहकार विद्या मंदिर यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा उत्सव शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सहकार ऑडीटोरीयम येथे थाटात पार पडला. उत्सवाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले.
अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुकेश झंवर, मृत्यूंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, गजेंद्र दांडगे, प्रा. हरीश साखरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानोबा कांदे, प्रा. सागर गवई, प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे, प्रा. निता बोचे उपस्थित होते.
आमदार श्री. गायकवाड म्हणाले, शहर सुंदर, स्वच्छ निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. झोपडपट्टीतील सामान्यवर्गातील 300 मुलांसाठी यावर्षीपासून सीबीएससी शिक्षण सुरु केले आहे. युवकांनी जात-पात-धर्म यापलिकडे जाऊन मानवता धर्म जोपासावा, असे आवाहन करून युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्राने घेतलेल्या युवा उत्सवाचे कौतुक केले. अप्पर जिल्हाधिकारी श्री. गीते यांनी राष्ट्रीय विकासाच्या कार्यात तरुणांनी पुढाकार घ्यावा. तसेच 18 वर्षावरील तरुणांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. तसेच युवकांनी व्यसनाधिनतेपासून दूर रहावे, जीवनात यशस्वीतेसाठी ध्येय निश्चित करावे, असे आवाहन केले.
जिल्हास्तरीय युवा उत्सवात चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नायब तहसिलदार श्री. पवार, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी केले. भाषण स्पर्धेत प्रथम सायर शेख, द्वितीय ओमप्रकाश गवई, तृतीय धनश्री टेकाळे यांनी पटकविला. मोबाईल छायाचित्र स्पर्धेमध्ये प्रथम मयूर सोनुने, द्वितीय हर्षल तायडे, तृतीय ऋतूराज बोकाडे, प्रोत्साहनपर प्रगती झनके यांनी पटकविला. कविता लेखन स्पर्धेमध्ये प्रथम नेहा धंदर, द्वितीय वेदांत बोबडे, तृतीय क्रमांक देवानंद रावणचवरे यांनी पटकविला. चित्रकला, पोस्टर स्पर्धेत प्रथम शाम रत्नपारखी, द्वितीय समर्थ जोशी, तृतीय उर्वी कथने, प्रोत्साहनपर गौरी उमाळे यांनी पटकावला. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम फोक आर्टीस्ट बुलडाणा, द्वितीय स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय साखरखेर्डा, तृतीय एएसपीएम महाविद्यालय, बुलडाणा यांनी पटकावला.
रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी आभार केले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, महेंद्र सौभागे, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुमित वाकोडे, सुरज बोरसे, उमेश बावस्कर, राहूल पवनकार, विनायक खरात, शिवाजी हावरे, देवानंद नागरे, वैभव नालट, शितल मुंढे, संतोष गवळी यांनी पुढाकार घेतला.