पो.डा. वार्ताहर , बुलडाणा :
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय बुलडाणा व बुलडाणा जिल्हा एथेलेटिक असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने एचआयव्ही एड्स जनजागृती करिता बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या सुरवातीला एचआयव्ही, एड्सबाबत आणि तंबाखू नियंत्रणाची शपथ घेण्यात आली. युवक आणि एचआयव्ही, एड्सबाबत माहिती, तसेच टोल फ्री क्रमांक १०९७ बाबत माहिती देण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. स्पर्धेत १०६ मुलामुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेत मुलांमधून प्रथम सुजित जाधव, द्वितीय महेश ढोले, तृतीय साहिलसिंग राजपूत, तसेच मुलींमध्ये प्रथम प्रणाली शेगोकार, द्वितीय आकांक्षा निंबाळकर, तृतीय ज्योती आराख यांनी मिळवला. त्यांना पारितोषिके, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत भुसारी, डॉ. घोंगटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, एआरटी सेंटर वैद्यकीय अधिकारी डॉ. लता भोसले, जिल्हा ॲथलेटिक असोशिएशनचे गोपालसिंग राजपूत, विजय वानखडे, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य नंदूराम गायकवाड, प्रा. अविनाश गेडाम उपस्थित होते.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील जिल्हा पर्यवेक्षक गजानन देशमुख, भागवत कव्हळे, अश्विनी वैष्णव, संदिप राऊत आयसीटीसी विभागातील नरेंद्र सनांसे, पियूष मालगे, इंदू मोरे, भावना कॅम्बेल, एसटीडी समुपदेशक भारत कोळे, एआरटी विभागातील डाटा मॅनेजर लक्ष्मीकांत गोंदकर, समुपदेशक प्रदीप बंबटकार, मिलींद इंगोले, दिपक गवई यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.