पो.डा. वार्ताहर , जव्हार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार (जि. पालघर) येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. प्रारंभी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आज क्रांतीदिन असून आजच ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभ झाला आहे. याचा उल्लेख करून स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेल्या यागदानाचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी शहीदांना अभिवादन केले.
प्रत्येक घटकाला मान सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. राज्य सरकारने आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट केला असून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्व परीक्षा केंद्र सुरू केले आहे. १०० विद्यार्थ्यांना पीएचडी साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल.असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले