पो.डा. वार्ताहर, औरंगाबाद : आगामी कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणुक विभागाने तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून आज जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नव्या एम-3 प्रकारच्या 17 हजार 500 मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) 5 टक्के यंत्रांच्या प्रथमस्तरावरील तपासणीतील मतदान यंत्र चाचणी प्रात्यक्षिक (मॉक पोल) आज एमआयडीसी रेल्वेस्टेशन भागातील वखार महामंडळाच्या गोदामात करण्यात आले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीची या चाचणीसाठी उपस्थिती होती. भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे अभियंते तसेच प्रक्रियेसाठी नियुक्त 150 अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष व्हावी यासाठी निवडणूक आयोगामार्फत मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय (एफएलसी) तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त एकूण यंत्रापैकी 5 टक्के यंत्रांवर मॉक पोल घेण्यात येत आहे. यातील ठराविक यंत्रावर केल्या जाणाऱ्या मतदानाची पडताळणीही करण्यात येत आहे. 7 हजार 644 बॅलेट युनिट, 4 हजार 719 कंट्रोल युनिट, 4 हजार 856 व्ही.व्ही.पॅट मशीन यांचा या चाचणीत समावेश आहे. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसनही अभियंत्यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकी करिता वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची प्रथम स्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीचे अभियंते यांच्यामार्फत करण्यात आली असून सदर प्रक्रियेचा भाग म्हणून आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चे शासकीय गोदाम रेल्वे स्टेशन एमआयडीसी या ठिकाणी mock poll प्रक्रिया पार पडली.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण तपासणी एफ एल सी केलेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चा तपशील पुढील प्रमाणे आहे. FLC केलेल्या बॅलेट युनिट 7641 पैकी एफ एल सी ओके आढळून आलेल्या 7526 आणि दुरुस्ती आवश्यक असलेल्या 115. एकूण CU म्हणजे कंट्रोल युनिट 4719 पैकी FLC ओके 4555, दुरुस्ती आवश्यक असलेल्या CU ची संख्या 164.एकूण VVPAT 4856 एफ एल सी ओके आढळून आलेल्या 4704 आणि दुरुस्ती आवश्यक असलेल्या VVPAT ची संख्या 152.
एफ एल सी ओके ईव्हीएम पैकी 5% म्हणजे एकूण 230 evm मध्ये मॉक पोल करावयाचे असून आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी यापैकी 138 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर मोकपोल करण्यात आले आहे . उर्वरित 92 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात येणार आहे. एकूण मॉक पोल करण्यात येणारे ईव्हीएम संख्या 230 असून पैकी 46 EVM मध्ये प्रत्येकी 1200 मतदान तसेच 92 EVM मध्ये प्रत्येकी 1000 आणि अतिरिक्त 92 EVM मशीनमध्ये प्रत्येकी 500 याप्रमाणे मोकपोल करण्यात येत आहे.
मॉक पोल ची प्रक्रिया उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्या देखरेखी खाली पार पडली. त्यांना उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी वैजापूर अरुण जराड , उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री सोहम वायाळ आणि तहसीलदार पैठण सारंग चव्हाण, तहसीलदार फुलंब्री कृष्ण कानगुले, तहसीलदार गंगापूर सतीश सोनी, तहसीलदार खुलताबाद स्वरूप कंकाळ यांच्यासह इतर 10 नायब तहसीलदार व 150 महसूल अधिकारी यांनी सहकार्य केले आहे.सदर प्रक्रिया सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि एम. आय. एम. या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित होते, त्यांनी स्वतः मॉक पोल च्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.