८ ते १५ ऑगष्ट दरम्यान विविध कार्यक्रम
पो.डा. वार्ताहर, वाशिम : ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” मागील वर्षी जिल्ह्यात ज्याप्रमाणे साजरा केला तशाचप्रकारे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत समारोपीय समारंभानिमित्त ” मेरी माटी -मेरा देश ” अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.
८ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट २०२३ या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय समारंभाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना विविध उपक्रमाचे फोटो,सेल्फी काढून ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व सेल्फी केंद्र शासनाच्या https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या संकेत स्थळावर अपलोड करावेत असे आवाहन श्रीमती पंत यांनी केले आहे.
विविध कार्यक्रमाची रूपरेषा
८ ऑगष्ट २०२३ रोजी ग्रामसभेचे आयोजन जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार आहे.त्यामध्ये सांगता समारोहात राबविण्यात येणा-या उपक्रमाची चर्चा व नियेाजन करणे हा विषय ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय समारंभासाठीचे बॅनर्स व पोष्टर्स लावून जनजागृती तसेच प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्या दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
९ ऑगष्ट २०२३ रोजी “वसुधा वंदन” अंतर्गत शिक्षण विभागामार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी गावात प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. एका कलशात माती गोळा करण्यात येणार आहे. हे उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार आहे.त्यामध्ये गावात प्रभातफेरीमध्ये एक लिटर आकाराचे कलशाची मिरवणुक काढून ” मेरी माटी – मेरा देश ” या अभियानासाठी कलशामध्ये माती गोळा करणे ,अमृत सरोवर, शाळा व ग्रामपंचायतीमध्ये तयार केलेल्या शिलाफलकाचे स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियाच्या हस्ते उदघाटन करणे,मातीचा दिवा हातात घेवून पंचप्राण शपथ घेणे व सेल्फी काढणे व शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करणे यासारख्या उपक्रमाचा यामध्ये समावेश राहणार आहे.
१० ऑगष्ट २०२३ रोजी पंचायत समिती स्तरावर सर्व गावातून माती कलश जमा करणयात येणार आहे. ग्रामपंचायत स्तर व पंचायत समिती स्तरावर किमान ७५ स्वदेशी रोपांची अमृत रोपवाटीका तयार करणे.सर्व गावातील माती एकत्रीत करुन पंचायत समितीस्तरावर पाच लिटर आकाराचे दोन तांबे कलश तयार करणे व पंचायत समिती स्तरावर शिल्लक असलेले ध्वज नागरिकांना वितरीत करण्यासाठी ग्रामपंचायतीना देणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
११ ऑगष्ट २०२३ रोजी वसुधा वंदन अंतर्गत ग्रामपंचायतस्तर व पंचायत समिती स्तरावर अमृतवन तयार करण्यासाठी किमान ७५ रोपांची लागवड करणे व त्याचबरोबर ग्रामपंचायतस्तरावर यावर्षी देण्यात आलेल्या उदिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
१२ ऑगष्ट २०२३ रोजी गावपातळीवर शहीद,क्रांती इ.सारखे गावपातळीवर देशभक्तीपर चित्रपट प्रोजेक्टरवर दाखविण्यात येणार आहेत.पंचायत समितीस्तरावर जमा केलेले पाच लिटर आकाराचे दोन कलश जिल्हास्तरावर पोहचविणे व प्रत्येक घरी ध्वजारोहण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे शिल्लक असलेले व पंचायत समितीकडून प्राप्त ध्वजाचे वितरण नागरिकांना करणे. इ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
१३ ऑगष्ट २०२३रोजी गावपातळीवर ” घरोघरी तिरंगा ” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावपातळीवर शाळेत विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.नगर परिषद /पंचायतमार्फत आयोजित अमृत महोत्सवी मॅराथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यात येणार आहे.
१४ ऑगष्ट २०२३ रोजी गावपातळीवर ‘घरोघरी तिरंगा ‘ उपक्रम राबविणे, गावपातळीवर सायंकाळी मशाल फेरीचे आयोजन करणे व स्वातंत्र्य लढयातील आठवणींना उजाळा देणे व जिल्हास्तरावर आयोजित मशाल फेरीच्या मुख्य कार्यक्रमात सहभाग नोंदविणे यासारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
१५ ऑगष्ट २०२३ रोजी गावपातळीवर घरोघरी तिरंगा उपक्रम राबविणे,पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करणे,वीरांना वंदन अंतर्गत ध्वजारोहणानंतर गावातील सर्व स्वातंत्र्य सैनिक,वीर जवान व शहिद कुटुंबियांचा यथोचित सत्कार ग्रामपंचायतीमार्फत करणे,विविध शालेय स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना बक्षीस देणे व शाळेत “एक मुल एक झाड” अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच पंचायत समिती स्तर व ग्रामपंचायत स्तरावर ‘एक कर्मचारी एक झाड ‘ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करणे इ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्रीमती पंत यांनी सांगितले.