पो.डा. वार्ताहर , औरंगाबाद : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादतर्फे ‘जागतिक आदिवासी दिन’ निमित्त बुधवार दि.9 रोजी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर, आधार कार्ड नोंदणी, जातीचे दाखले, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र इ. आवश्यक दस्तऐवजांबाबत माहिती शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी, एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी दिली आहे.
संयुक्त राष्टसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या ठरावानुसार 9 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा केला जातो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंतर्गत औरंगाबाद, लातुर, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुधवार दि.9 रोजी डीडीएल लॉन्स, गौताळा रोड कन्नड जि. औरंगाबाद येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच यानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यालये, आश्रमशाळा, वसतिगृह इ. ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विद्यार्थी आरोग्य तपासणी, आधार कार्ड नोंदणी, जातीचे दाखले, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक बाबींच्या माहिती शिबीरे तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपयोजना क्षेत्र यामध्ये शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा आदिवासी बंधू भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी केले आहे.