पो.डा. वार्ताहर , औरंगाबाद,: महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, शिक्षण विभाग व पंचायत विभाग यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाचे कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रे देऊन बुधवारी (दि.2)गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.रामावत, जिल्हा समन्वयक विठ्ठल के. घोगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत शिक्षण विभाग व पंचायत विभाग यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निकाषांप्रमाणे पात्र शाळांची निवड करण्यात आली. त्यात जांभळी बु. ता. पैठण, जिल्हा परिषद शाळा खोडेगाव ता.औरंगाबाद व जिल्हा परिषद शाळा कंकोरी ता.गंगापूर यांची निवड करण्यात आली.
जि.प. शाळा प्राथमिक, कनकोरी-ता.गंगापूर-एफ.एन.तडवी, जि.प. शाळा खोडेगाव, ता.औरंगाबाद- श्रीराम नामदेव सपकल, जि.प शाळा जामली ता-पैठण-अरूण धोतके यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील (VSTF) या शाळांना शिक्षण विभाग, पंचायत विभाग व इतर संलग्न विभागाशी समन्वय साधून कृती आराखडा तयार करण्यात आला होता. शासकीय योजना व VSTF यांचा कृतीसंगम करून शाळांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे उपक्रम, गणिताचे गाव, पाणीसाठा वॉटर फिल्टर इ. आवश्यक उपकरणे घेणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, लोकसहभाग व श्रमदान या माध्यमातून शाळांचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.