पो.डा.वार्ताहर , रत्नागिरी : – खेड तालुका हा सैनिकांचा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात आजी माजी सैनिक आहेत. त्यातही शिवतर हा गाव सैनिकांचा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सैनिक हा देशासाठी प्राण देण्यासाठी तयार असतो. सेवानिवृत्तीनंतर त्याची कामे प्राधान्याने करणे हे गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल हेमंत भागवत यांनी केले.
श्री.भागवत हे महसूल सप्ताहानिमित्त खेडमधील डाकबंगला वैश्यभवन येथे शनिवारी आयोजित केलेल्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी ‘ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीमती राजश्री मोरे, तहसीलदार सुधीर सोनवणे, सर्व महसूल कर्मचारी, विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सैनिक हा आपल्या देशाचे रक्षण करीत असतो. देशासाठी प्राण देण्यास कधीही तयार असणारा सैनिक कधीतरी सुट्टी घेऊन गावी येतो. मात्र, अचानकपणे त्याला बोलावणे येते. मग हा सैनिक आपली महत्त्वाची कामे टाकून देशरक्षणासाठी कर्तव्यावर जातो. त्यावेळी तो जरी सैनिक असला तरी, तो भावनिक असल्याने आपली महत्त्वाची कामे कशी होणार ? याची चिंता त्याला सतावत असते. ज्यावेळी तो निवृत्त होऊन गावी येतो त्यावेळी सरकारी दरबारी असणारी कामे प्राधान्याने मार्गी लागणं हे गौरवास्पद आहे. विशेषतः नागरिकांनीही त्याच्या देशसेवेची जाणीव व कदर करायला हवी. अशी अपेक्षाही श्री. भागवत यांनी व्यक्त केली.
भारत हे शक्तिशाली राष्ट्र आहे. भारतीयांना स्वतः ची ताकद ओळखता आली पाहिजे, असेही ते म्हणाले,
यावेळी एअर मार्शल हेमंत भागवत, तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माता यांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिक, तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, कर्मचारी असलेले माजी सैनिक, यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रांताधिकारी राजश्री मोरे तर आभार प्रदर्शन तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी केले. सूत्रसंचालन अंजली गिल्डा यांनी केले.