पो. डा. वार्ताहर , गडचिरोली : एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराची बसचा एका बाजुचे छत उखडलेल्या अवस्थेत धावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि प्रसार माध्यमांनी तो दाखविल्यानंतर महामंडळाला जाग आली. यासाठी जबाबदार असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेचे अभियंता (यांत्रिकी ) शि.रा.बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे.
सदर बसच्या दुरूस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने हा प्रकार घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या दुर्लक्षामुळे सदर बस दुरुस्तीविना प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात आली आणि त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा डागाळल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी कळविले.
दरम्यान अशा खिळखिळ्या झालेल्या आणि दुरूस्तीची गरज असलेल्या जवळपास २० बसेस गडचिरोली विभागीय कार्यशाळेत दुरूस्तीसाठी परत बोलविण्यात आल्या आहेत. त्यात अहेरी आगाराच्या ११, ब्रह्मपुरी आगाराच्या ३ तर गडचिरोली आगाराच्या ७ बसेसचा समावेश असल्याचे विभाग नियंत्रक सुकन्या सुतावणे यांनी सांगितले.