पो.डा. वार्ताहर , बुलढाणा : शाळकरी मुलांमध्येही अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे युवा पिढी वाईट मार्गावर जात असल्याने पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन अंमली पदार्थाबाबत पालकांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.
अंमली पदार्थ विरोधी कारवाई समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे आदी, मेहकर उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, प्रतिबंधात्मक कारवाई करताना प्रामुख्याने ज्या युवांवर अंमली पदार्थाचा दुष्परिणाम जाणविणार आहे, त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करावी. पोलिस विभागाने केंद्रप्रमुखांच्या बैठकीमध्ये शाळा परिसरात होणाऱ्या अंमली पदार्थाबाबत माहिती द्यावी. तसेच पालक-शिक्षक सभेमध्ये अंमली पदार्थाची माहिती देण्यासंबंधी शाळांना देण्यात याव्यात. यामुळे मुलांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल.
अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सिमेवर कडक कारवाई करावी. प्रतिबंधात्मक कारवाई करताना राज्य आणि जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी करावी. इतर राज्यात जाणाऱ्या अवैध दारूवर कारवाई करावी. तसेच दारूप्राशन करून वाहन चालविल्यामुळे धाब्यावर दारू किंवा तत्सम अंमली पदार्थ उपलब्ध होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात यावी. अवैधरित्या दारू विक्री प्रकार पूर्णपणे बंद कराव्यात. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलिसांनी वचक निर्माण करावा. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईवर तात्काळ निर्णय घेण्यात येईल. समृद्धी महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.