मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण मधील अतिवृष्टीचा फटका
पोलीस डायरी वार्ताहर : गेल्या आठवड्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसाने अतिवृष्टीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण विभागात देण्यात येत असलेल्या रेड, यलो अलर्टमुळे प्रशासनाला सातत्याने शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत.
सलगच्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कल्याणमधील अनेक शाळांनी पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा भरवल्याने कोरोनाच्या साथीनंतर विद्यार्थ्यांना घरूनच अभ्यास करण्याचा अनुभव परत मिळत आहे. मुंबई सह कोकण विभागात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली. अशा प्रसंगावर मार्ग शोधत पुढे जावे लागणार याच हेतूने विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता यावा म्हणून कल्याणमधील शाळांनी पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षण सुरु केले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहून अभ्यासात खंड पडू नये, आपल्या घरीच सुरक्षित राहून त्यांनी अभ्यास करावा, या उद्देशाने शालेय गणवेशात शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाइन शाळा भरवण्यात आल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
शिक्षकांनीही व्हॉट्सएप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला. शाळा नसली तरीही शालेय गणवेशावर आपली मुले अभ्यास करत असल्याचे पाहून पालक या वेळी समाधान व्यक्त आहेत.