जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमाच्या आयोजनाचा घेतला आढावा
पो. डा. वार्ताहर,नागपूर : महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याची सामाजिक उपयुक्तता, या कामाबद्दल सामान्य नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विविध उपक्रमामार्फत जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये शनिवारी या संदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार एक ते सात आगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर विविध जनजागृतीचे कार्यक्रम या काळात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना, लाभाच्या योजना विद्यार्थ्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त, अधिकारी कर्मचारी संवाद ,आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश आजच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.