पो. डा. वार्ताहर , औरंगाबाद : जिल्ह्यात दुध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विक्री करतांना त्यात भेसळयुक्त तसेच मुदतीनंतर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले.
दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीवर पायबंद घालण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीची बैठक गुरुवारी (दि.27) पार पडली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अन्न औषध प्रशासन सहायक आयुक्त अ.अ.मैत्रे, जिल्हा पशुंसवर्धन उपायुक्त डॉ.पी.डी. झोड, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी. दराडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ-मोरे आदी उपस्थित होते.
दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात धडक कार्यवाही करण्यासाठी या बैठकीत निर्देश देण्यात आले. अशा भेसळ प्रक्रियेत सहभागी व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी असेही निर्देशित करण्यात आले. दुध विक्रेते, मिठाई विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांनी विक्री करत असलेले दुध व दुग्धजन्य पदार्थ हे उच्च दर्जाचे व भेसळविरहीत निर्माण होतील यासाठी विशेष व्यवस्था करावी. अशा पदार्थांची वापराची मुदत नमूद असावी. असे मुदतपूर्व दिनांक पदार्थांच्या पॅकेटवर नमुद असणे बंधनकारक आहे. यासंदर्भात जिल्ह्यात खवा, मावा इ. दुध व दुग्धजन्यपदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी तपासणी करुन जिल्हास्तरीयसमिती मार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश डॉ. गव्हाणे यांनी दिले.