पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर : चंद्रपूर शहराच्या वडगाव प्रभागातील अनेक घरांमध्ये 28 जुलै रोजी पहाटेपासून अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
प्रभागातील मित्र नगर,दत्तनगर, शंकर गृहनिर्माण सोसायटी ,अपेक्षा नगर ,भावनाथ सोसायटी, वडगाव जुनी वस्ती मधील सोमय्या पॉलिटेक्निक रोड, नानाजी नगर इत्यादी भागातील घरांमध्ये पहाटे चार वाजेपासून पाण्याचा शिरकाव झाला. अचानक घरात पाणी आल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.मात्र पाऊस थांबल्यानंतर सकाळी 10 वाजेपासून पाणी ओसरणे सुरू झाल्याने लोकांना दिलासा मिळाला. आज सकाळपासून जनविकास सेनेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख, जनविकास महिला आघाडीच्या मनीषा बोबडे , युवा आघाडीचे अक्षय येरगुडे इत्यादी कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.जुलै महिन्यात दुसऱ्यांदा वडगाव प्रभागातील अनेक परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान झाले.शंकर गृहनिर्माण सोसायटीतील घरे व विविध अपार्टमेंट्सच्या तळमजल्यावरील फ्लॅट्स तसेच संपूर्ण परिसर जलमय झाला.दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी पाणी ओसरले नव्हते.