पो. डा. वार्ताहर ,नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या इतर विभागांप्रमाणेच नागपूर विभागातही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिन्यांचा असावा, विद्यार्थ्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशी यांच्याद्वारे करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर ‘बार्टी’द्वारे प्रशिक्षण कालावधी वाढविण्यात आला आहे.
मागील अनेक दिवसांपासून मागणीसाठी लढा देणा-या विद्यार्थ्यांनी या यशाबद्दल उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व त्यांचे मानद सचिव श्री.संदीप जोशी यांचे आभार मानले. ‘देवगिरी’ येथे सर्व २०० विद्यार्थ्यांनी श्री. संदीप जोशी यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देउन यशाचा आनंद साजरा केला.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महाराष्ट्रामध्ये नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे विभाग केंद्र आहेत. या सर्व विभाग केंद्रांमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. नाशिक, औरंगाबाद, पुणे या तिनही विभागांमध्ये प्रशिक्षणाचा कालावधी हा १२ महिन्यांचा आहे. मात्र नागपूर येथे हा कालावधी केवळ १० महिन्यांचाच आहे. नागपूर विभागातील केंद्राचा कालावधी सुद्धा १२ महिन्यांचा करण्यात यावा या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांद्वारे बार्टीला वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र कुठलिही कारवाई करण्यात आली नाही.
१५ दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी ‘देवगिरी’ येथे उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशी यांची भेट घेउन मागणीचे निवेदन सादर केले. श्री. संदीप जोशी यांनी देखील विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जावा, यादृष्टीने उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय मांडला व सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्राधान्याने विषयाकडे लक्ष देत विषय मार्गी लावला व १५ दिवसांमध्ये प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करण्यात आली.
विदर्भातील विविध भागातून आलेले व स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. संदीप जोशी यांचे आभार मानले. मात्र या निर्णयाचे संपूर्ण श्रेय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचे श्री. संदीप जोशी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विषय पुढे ठेवताच त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय व्हावा यादृष्टीने स्वत: जातीने लक्ष घालून उपमुख्यमंत्र्यांनी विषय मार्गी लावल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले. उच्च शिक्षित, विधिज्ञ आणि ‘गोल्ड मेडलिस्ट’ असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव असल्याने त्यांनी प्राधान्याने विषयाला न्याय दिला, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करून भविष्यात विविध विभागांमध्ये अधिकारी पद भूषविताना विद्यार्थ्यांनी जात-पात, धर्म-पंथ यापलिकडे जाउन जनतेची सेवा करावी, अशी आशा व्यक्त करीत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.