पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : पैसा, वाणी, मिलीपेड्स या किडींमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीवर उपाय योजना कराव्यात, असे आवाहन कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
किडीच्या उपाययोजना करण्यासाठी शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले, कुजलेले काडीकचरा गोळा करून नष्ट करावे. वाणी रात्री जास्त सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी, शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणीचे समूह जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावे. शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करून बांधावरील गवत दगड काढून बांध मोकळा ठेवावा.
जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया केली आहे, तेथे प्रादुर्भाव कमी आढळून येतो. पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी, त्यामुळे जमिनीतील अंडी आणि लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतात. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. ज्या शेतांमध्ये वारंवार या किडींचा प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसेलफॉन 6 टक्के दाणेदार किंवा क्लोरोपायरीफॉस १० टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील 3 टक्के दाणेदार ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टर शेतात पसरावे. सदरील किटकनाशके प्रयोगामध्ये परिणामकारक आढळून आले आहे. शेतकऱ्यांनी या उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.