पो. डा. वार्ताहर , नागपूर : मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये म्हणून तहसील कार्यालय नागपूर(ग्रामीण) तर्फे शेताच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण व जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकरी आणि शेतमजूरांना लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगत मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2023 अंतर्गत विशेष उपक्रम ‘मिशन 75’ द्वारे मतदार नोंदणी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मतदार नोंदणीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे 75 कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून नागपूरचे (ग्रामीण) तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या नेतृत्वातील निवडणूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गावागावांत मतदार सर्वेक्षण व नोंदणी सुरू केली आहे. आज बुधवारी खंडाळा, वलनी आदी गावांमधील लोक मशागतीच्या कामांमूळे शेतावर गेल्याने निवडणूक शाखेच्या पथकाने बांधावर धाव घेतली आणि सर्वेक्षण व जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेत नायब तहसीलदार व्ही. आर. थोरवे, मंडळ अधिकारी असीम खान, तलाठी पंकज बावनकुळे आणि बीएलओ किरण सोनटक्के आदींनी अथक परिश्रम घेतले.