जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ प्रवास्यांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रवासी बसेच्या सुरक्षतेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत प्रवास्यांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतुक बसेसची फिटनेस तपासणी करुन वाहण आणि वाहकांचीही शारीरीक व मानसीक तपासणी करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना केल्या आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, सहायक परिवहण अधिकारी आंनद मेश्राम, सहायक मोटर वाहण निरीक्षक अमित काळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे, शिक्षण विभाग प्रमूख प्रतिक शिवणकर शहर संघटक विश्वजीत शाहा, विलास सोमलवार आदीची उपस्थिती होती.
मुंबई, नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जिव गेला आहे. सदर घटना ही प्रवासी वाहतूक बसेसमध्ये मानवी व तांत्रिक चुका झाल्यामुळे घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून पुणे, औरंगाबाद तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना, आंध्रप्रदेश राज्यात लांब प्रवास करणाऱ्या बसेसने प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामूळे सदर दुर्दैवी घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यात प्रवासी वाहतूक बस यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून नियमांचे पालण करणे गरजेचे आहे. वाहतुक बसेस या नियमांचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, महामार्गावर चालणाऱ्या प्रवासी वाहतूक बसेस चालकांची मद्यप्राशन चाचणी करण्यात यावी, विमान सेवेत देण्यात येणाऱ्या आपातकालीन माहिती च्या धर्तीवर बस मध्ये प्रवास सुरु करतांना प्रवाशांना बस मधील आपातकालीन मार्गाचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात यावी, आपातकालीन परिस्थितीत बस च्या काचा फोडण्यासाठी साहित्य ठेवण्यात यावे, प्रत्येक प्रवासी वाहतूक बस मध्ये अग्नीरोधक ठेवण्यात यावा, बसेस च्या टायर मध्ये नियमानुसार हवेचा दाब असल्याची खात्री करण्यात यावी, आदी सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या आहे.