पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार भरत गोगावले, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मिरा भाईंदर हे शहर मुंबई व ठाणे शहराच्या बरोबरीने पुढे यायला हवे, यासाठी येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांचा टोलचा प्रश्न मिटेल. तसेच मुंबई सागरी किनारा मार्गही विरार ते थेट पालघर पर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच बांद्रा – वर्सोवा आता विरार पर्यंत आणणार आहे. तसेच मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
मिरारोड (पू.) येथील आरक्षण क्र. २४८ येथील सद्गुरू सदानंद महाराज सभागृह व कै. हरिचंद्र आमगांवकर जिमनॅस्टीक सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन, केंद्र शासनाच्या हवेची गुणवत्ता सुधारणा निधीमधून प्राप्त विविध कामांचे लोकार्पण, आमदार निधीतील आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण, महानगरपालिका निधीतील व शासनाच्या निधीतील सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजन, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आधारित वाढीव मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्था भूमिपूजन, मिरा भाईंदर महानगरपालिकेची भुयारी गटार योजना टप्पा- २ (भाग-१), नगर विकास विभागाकडील मुलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेतील विविध कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. भाईंदर (पूर्व) इंद्रलोक आरक्षण क्र. ११५ मधील शाळा इमारतीचे लोकार्पण. काशिमिरा येथील प्रभाग समिती क्र.०६ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे इमारतीचे लोकार्पण. भाईंदर (प.) रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार लोकार्पण. किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार लोकार्पण, माणिकपुर पोलीस ठाणे नुतन इमारतीचे लोकार्पण आदी कामांचे आज लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी राज्य शासनाच्या वर्षपूर्ती निमित्त काढण्यात आलेल्या गाण्याचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महिला बचतगटांना विविध व्यावसायिक साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.