पो. डा. वार्ताहर , नागपूर : सिकलसेल नियंत्रणासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय सिकलसेल मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहीमेंतर्गत जिल्हास्तरीय मोहिमेची सुरुवात उद्या, दि. 1 जुलैपासून होणार आहे.
सिकलसेल मोहिमेअंतर्गत तरुणांमध्ये सिकलसेल विषयी जनजागृती तसेच सिकलसेल तपासणी, कार्ड वितरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे. तरुणांमध्ये सिकलसेल विषयी जागृती व्हावी तसेच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळावे या अनुषंगाने राष्ट्रीय सिकलसेल मिशन देशभरात राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशपातळीवर या मिशनचे उद्घाटन करणार आहेत.
सिकलसेल तपासणी मोहिमेची सुरुवात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हास्तरावरील सर्व आरोग्य संस्थेवरून लोकप्रतिनिधी अधिकारी, कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर सिकलसेल तपासणी कार्ड वितरण करण्यात येणार आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड मिळविण्यासाठी लागणारी पद्धत याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.