पो. डा. वार्ताहर पंढरपूर : पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी स्वच्छता दिंडी समारोप समारंभात व्यक्त केला. गेल्या १७ वर्षापासून काढण्यात येणाऱ्या स्वच्छता दिंडी उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वच्छभारत अभियान सुरू केल्यामुळे नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणे ही समाधानकारक बाब आहे. पंढरपूर येथे सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्यारितीने झाले आहे. पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढते आहे. अशावेळी स्वच्छतेचे नियोजन आणि इतर सुविधा चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता दिंडीत सहभागी वारकऱ्यांचे अभिनंदन केले.
वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व जनतेला देण्याचा आणि ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.