पो.डा. वार्ताहर, बुलडाणा :
कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवा आंब्याच्या विविध 40 प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या प्रदर्शनी आज उद्घाटन केले.
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि नागरिकांना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रोडवरील कृषि विज्ञान केंद्रात शुक्रवार, दि. १७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्री पार पडली. या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते. तसेच आंब्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे महिला बचतगटांचे ७ दालन होते.
आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सावजी, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव, माविमचे सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, विनायक सरनाईक उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आंबा घन लागवड पद्धतीचे फायदे सांगितले. तसेच भारतीय आंबा फळाला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने त्याच्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आंबा महोत्सव आयोजनाबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी माहिती दिली. पुरुषोत्तम उन्हाळे यांनी आंब्याच्या स्थानिक जाती व जैवविविधतेची सांगड घालून शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी असे आवाहन केले. मनोजकुमार ढगे यांनी आंबा फळबाग लागवड आणि शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
महोत्सवात स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री, तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले.
मनेश यदुलवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भारती तिजारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अनिल तारू, डॉ. एन. एस. देशमुख, डॉ. भारती तिजारे, प्रवीण देशपांडे, मनेश यदुलवार, कृतिका गांगडे, कोकिळा भोपळे. अनुराधा जाधव, अनिल जाधव, शिवाजी पिसे, नयन चव्हाण यांनी पुढाकार घेतला.