पो.डा. वार्ताहर , नागपूर. : एकदा तोंडातून शब्द काढला तो पूर्ण करणारच नव्हे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीकडून पाठपुरावा करून तो विषय पूर्णत्वास नेला जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष देणारा नेता म्हणजे श्री. नितीन गडकरी, प्रतिपादन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांनी ‘नितीनजी म्हणजे द मॅन ऑफ वर्ड्स’ असे विशेषन लावून त्यांच्याप्रति भावना व्यक्त केली.
खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे विविध क्रीडा संघटना, खेळाडूंची बैठक शनिवारी (ता.२३) रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे घेण्यात आली. या बैठकीत नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र फडणवीस, नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. हरीश व्होरा, निवृत्त क्रीडा उपसंचालक श्री. जयप्रकाश दुबळे, श्री. सुधीर दिवे, डॉ. पीयूष आंबुलकर, श्री. विजय मुनीश्वर, इकबाल कश्मीरी, अल्ताफ अहमद, श्री. सुधीर निंबाळकर, श्री. अरुण बुटे, श्री. सुनील भोतमांगे, मोहम्मद शोयब, श्री. संजय भोळे, श्री. उधमसिंग यादव, श्री. गजेंद्र बन्सोड यांच्यासह खासदार क्रीडा महोत्सवाचे सर्व सहसंयोजक, विविध संघटनेचे प्रशिक्षक, खेळाडू आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रारंभी क्रीडा महर्षी भाऊ काणे यांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पुढे बोलताना श्री. संदीप जोशी यांनी सांगितले, ‘दहा वर्षापूर्वी श्री. नितीनजी गडकरी यांच्या सोबत वाहनात प्रवास करीत असताना त्यांनी क्रीडा महोत्सवाची संकल्पना बोलून दाखवली व जबाबदारी स्वीकारणार का? याबद्दल विचारणा केली. त्याला मी होकार दर्शविला. यानंतर सदर बाब विस्मरणात गेली असताना दोन महिन्यानंतर अचानक फोन करून खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबद्दलचे कार्य कुठपर्यंत आल्याबद्दल प्रश्न केला. एखादी छोटीशी गोष्ट डोक्यात असताना त्याचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेणे आणि त्या माध्यमातून हजारो तरुण, खेळाडूंना लाभ मिळवून देण्याची दूरदर्शी संकल्पना मांडणारी व्यक्ती म्हणून देखील श्री. नितीनजी गडकरी यांचा श्री. संदीप जोशी यांचा गौरव केला.
आज नागपूर शहरात मेट्रो, एम्स, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, सिम्बॉयसिस अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक, आरोग्य, शैक्षणिक आणि अन्य सुविधांची निर्मिती झाली आहे. मात्र यासोबतच शहरात सांस्कृतिक, क्रीडा, औद्यागिक महोत्सव घेऊन येथील कलावंत, खेळाडू, उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचाही विकास साधण्याची संकल्पना श्री. नितीनजी गडकरी यांनी मांडली. खेळ आणि खेळाचा विकास व्हावा यासाठी खासदार क्रीडा महोत्सव निरंतर सुरू राहणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा, त्यांच्या मेहनतीला योग्य प्रोत्साहन मिळावे म्हणून हजारोंची बक्षीसे तसेच दुखापत झाल्यास जीवन उध्वस्त होऊ नये म्हणून सुरक्षा विमा, अशा बारीकसारीक पण महत्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याचे काम श्री. नितीन गडकरी यांनी केले. शहरातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळावे यासाठी महोत्सव सदैव सुरूच रहावे, यासाठी सर्वांनी खंबीरपणे श्री. नितीनजी गडकरी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन, श्री. संदीप जोशी यांनी यावेळी उपस्थित क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी तसेच खेळाडूंना केले.
बैठकीमध्ये नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र फडणवीस यांनी श्री. नितीन गडकरी यांनी क्रीडा क्षेत्रासाठी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानले. खेळाचा उत्तरोत्तर विकास व्हावा यासाठी श्री. नितीन गडकरी यांच्या व्हिजनला भरभरून भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील श्री. फडणवीस यांनी केले. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. हरीश व्होरा यांनी श्री. नितीन गडकरी यांनी शब्द दिला म्हणजे कार्य होणारच याची शंभर टक्के शाश्वती असल्याचे सांगत त्यांनी शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी पंधरा ते वीस वर्षाचा पुढचा विचार केला असल्याचे सांगितले.
निवृत्त क्रीडा उपसंचालक श्री. जयप्रकाश दुबळे यांनी खेळाडूंच्या मार्फत संत्रानगरींची नवी ओळख श्री गडकरी यांनी देशापुढे करुन दिली असल्याचे सांगितले. तसेच श्री. गडकरी यांचा खेळाडूंना अद्यावत सोयीसुविधा मिळवून देण्यावर भर असतो, त्यांच्याच संकल्पनेने देशाचा ‘मिनी ऑलिम्पिक’ खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरात गत सहा वर्षांपासून आयोजित केले जात असल्याने देश पातळीवर नावलौकिक मिळवून देणारे अनेक खेळाडू या मार्फत मिळाले असल्याचे सांगितले.