#पुणे | मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ७०० कोटी रुपयांच्या नियोजित ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी (दूरदृश्यप्रणालीद्वारे) ,
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भूयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करीत आहेत. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने विकासाचा महामार्ग होणार आहे, असे सांगून राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक विकासकामे होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी #वंदेभारत रेल्वे महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. या महामार्गावर प्रवास करताना वेळ वाचावा यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला सर्वाधिक रुंदीचा बोगदा मिसिंग लिंक अंतर्गत तयार करण्यात येत आहे. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि योजनांचा लाभ देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कात्रज चौक ते खडी मशीन मोठा पूल तयार केल्यास त्याचाही लाभ नागरिकांना होईल. महाबळेश्वर येथील वाई-सुरूर-महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.