छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या #शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत किल्ले #रायगड येथे आज मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी पारंपरिक पद्धतीने दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवछत्रपतींची भक्तिभावाने आरती केली. यावेळी शिवछत्रपतींच्या पालखीची जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड विकास प्राधिकरण निर्माण करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही, शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असे सांगून प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरण निर्माण करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार सर्वश्री छत्रपती उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, सदाशिव लोखंडे, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.