पोलीस डायरी प्रतिनिधी: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शिर्डी येथे आले होते. यानंतर त्यांनी नाशिकमध्ये दौरा केला. नाशिक दौऱ्यावर त्यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. बैठकीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच मिश्किल टोला त्यांना लगावला. छगन भुजबळ देखील नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना केसरकर यांना हा टोला लगावला.
नाशिक मध्ये शिक्षण विभागाची बैठक घेतल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिर्डी दर्शना बाबत केसरकर यांना विचारले असता केसरकर म्हणाले, अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा पूर परिस्थिती असताना मी योगायोगाने शिर्डीत होतो. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले, की ५ फूट लेव्हल वाढते. पण, यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. त्यामुळे एक फुटाने पण लेव्हल वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे, देवाकडे मी प्रार्थना करत होतो. पाटबंधारेकडे तुम्ही चौकशी केली तर ५-६ फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती. निसर्गात पण देव आहे, असं केसरकर म्हणाले.
मंत्री छगन भुजबळ देखील नाशिक मध्ये उपस्थित होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला माध्यमांशी संवाद साधत असताना माध्यम प्रतिनिधींनी मंत्री दीपक केसरकर यांच्या या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता मंत्री भुजबळ यांनी पहिल्यांदा हात जोडले. भुजबळ म्हणाले ‘”तुम्ही इकडे या आनंद आहे, तुम्ही सुद्धा देवाचा धावा करा आणि आमच्या इकडची धरणे लवकर लवकर भरू द्या आमची सगळी धरणे ५० टक्क्यांच्या खाली आहेत एखादं धरण भरलेलं आहे.”
मंत्री दीपक केसरकर यांच्या या दाव्यावर सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीने प्रतिक्रिया आता व्यक्त केली आहे. केसरकर यांचं वक्तव्य आणि भुजबळांचा टोला चर्चेचा विषय ठरला.